
‘लेह-लडाखवासीयांनी ज्या उद्देशासाठी लढाई सुरू केली आहे तो उद्देश पूर्ण होईल. लवकरच नवा सूर्य उगवेल, नवी पहाट उजाडेल,’ असा आशावाद सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी आज व्यक्त केला.
लेहमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली होती. सहा महिन्यांनंतर न्यायालयाने त्यांची सुटका केली. तुरुंगातून सुटल्यानंतर आज प्रथमच लडाखमध्ये पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी लडाखच्या हजारो नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावल्या होत्या. स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमात त्यांनी लोकांना संबोधित केले. ‘170 दिवसांनंतर पुन्हा या डोंगरदऱयांमध्ये आलो. लोकांना भेटून मला आनंद झाला आहे. हेच सकारात्मक वातावरण पुढेही कायम राहील अशी आशा आहे. संघर्षाच्या काळात देशातील अनेक लोकांनी मला पाठिंबा दिला. त्या सर्वांचा आभारी आहे,’ असे वांगचुक म्हणाले.
मला कटुता ठेवायची नाही!
‘तुरुंगवासाचा काळ खूप कठीण होता. हा माझ्यासाठी आत्मचिंतनाची संधी होती. स्वतःला समजून घेण्याची होती. न्यायाच्या दृष्टीने काही चुका झाल्या हे खरे, मात्र नंतर त्या सुधारण्यात आल्या. जागरुकता आल्याचे हे द्योतक आहे. मला कोणत्याही प्रकारची कटुता ठेवायची नाही. चर्चेतून पुढे जायचे आहे,’ असे ते म्हणाले. पेंद्र सरकारने रचनात्मक आणि अर्थपूर्ण संवादाचा प्रस्ताव दिला आहे. ‘आम्हाला हेच हवे होते आणि त्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, दिल्लीपर्यंत पायी चालत जावे लागले आणि उपोषणाला बसावे लागले. लडाखमधील सर्व आंदोलनांचा उद्देश हा संवाद प्रक्रिया सुरू करणे हाच आहे,’ असे ते म्हणाले.
























































