
यजमान वेस्ट इंडीजने सलग दुसऱ्या टी-20 क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 30 धावांनी पराभव करीत तीन सामन्यांची मालिका आधीच खिशात घातली. महत्त्वाच्या तीन विकेट टिपणारा रोमारिओ शेफर्ड या विजयाचा शिल्पकार ठरला. विंडीजने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
वेस्ट इंडीजकडून मिळालेल्या 180 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव 19.4 षटकांत 149 धावांवरच गारद झाला. त्यांच्याकडून रीझा हेंड्रिक्सने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. त्यानंतर रायन रिकेल्टन (20), कर्णधार एडेन मार्करम (19), ट्रिस्टन स्टब्स (28), रस्सी वॅन डेर डुसेन (17) यातील कोणालाही मोठी खेळी करता न आल्याने दक्षिण आफ्रिकेला ‘करो या मरो’ लढतीत पराभव पत्करावा लागला. विंडीजकडून रोमारिओ शेफर्डने 13 धावांत 3 विकेट टिपले. शामर जोसेफनेही 3 फलंदाज बाद केले. अकिल होसैनने 2, तर मॅथ्यू फोर्ड व गुडाकेश मोटी यांनी 1-1 विकेट घेतली.
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडीजने 6 बाद 179 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. शाई होप (41) व एलिक अथानाजे (28) यांनी 34 चेंडूंत 41 धावांची सलामी दिली. निकोलस पूरण (19) व रोस्टन चेस (7) बाद झाल्यानंतर कर्णधार रोवमन पॉवेल (35) व शेरफेन रूदरफोर्ड (29) यांनी पाचव्या विकेटसाठी 28 चेंडूंत 47 धावांची वेगवान भागीदारी केल्याने विंडीजला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. दक्षिण आफ्रिकेकडून लिझाद विल्यम्सने 3, तर पॅट्रिक क्रुगरने 2 फलंदाज बाद केले. ओट्टनील बार्टमनलाही एक विकेट मिळाली.