सुपरडुपर थरार; दुहेरी सुपर ओव्हर सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड, टॉलीवूडच नव्हे तर हॉलीवूडच्याही सस्पेन्स-थ्रिलर सिनेमाला लाजवेल अशा थरारक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बाजी मारत टी-20 वर्ल्ड कप इतिहासातील सर्वोत्तम विजयाची नोंद केली. चक्क दोनदा बरोबरीत सुटलेला सामना तिसऱयांदाही बरोबरीत सुटणार असे वाटत असतानाच रहमान गुरबाज झेलचीत झाला आणि अखेर दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 4 धावांनी विजय मिळवत ड गटातून आपला सुपर एट प्रवेश जवळजवळ निश्चित केला तर अफगाणिस्तानसाठी ही हार त्यांचे स्पर्धेतील आव्हान डळमळीत करणारी ठरली.

आजचा सामना पाहताना एखादा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहत असल्याचा अनुभव आला. हा सामना कमकुवत हृदयाच्या क्रिकेटप्रेमींनी पाहू नये, असा डिस्क्लेमर सामना सुरू असताना लावायची वेळ आली होती. दोलायमान स्थितीत असलेल्या सामन्यात दोघांनीही विजयाची समान संधी होती, पण शेवटच्या षटकांत दक्षिण आफ्रिकेचे पारडे जड वाटत होते. क्विंटन डिकॉक आणि रायन रिकल्टन यांच्या शतकी भागीनंतर आफ्रिकन संघ सहज दोनशेचा टप्पा गाठणार असे चित्र उभे राहिले होते, पण ही जोडी फुटली आणि अफगाणिस्तानने आफ्रिकेला 187 धावांत रोखले. 188 धावांचा पाठलाग करतानाही विजयाचा काटा दोन्ही संघांच्या बाजूने सरकत होता. शेवटच्या षटकांत 13 धावांची गरज असताना एडन मारक्रमने चेंडू रबाडाच्या हातात दिला. पण रबाडाने पहिलाच चेंडू नो टाकत सामना अफगाणिस्तानला बहाल केल्यासारखा वाटला. नूर अहमदने रबाडाच्या चेंडूवर  षटकार खेचत सामन्याचा नूरच फिरवला. मग त्याने चौथा चेंडूही नो टाकत निराश केले. त्यामुळे तीन चेंडूंत 2 धावांची गरज असताना दुहेरी धाव काढून विजयावर शिक्कामोर्तब करण्याच्या प्रयत्नात रबाडाने यान्सनच्या थ्रोला पकडत स्टम्पच्या दिशेने झेप घेत बेल्स उडवल्या आणि फझलहक फारुकीला धावचीत केले आणि सामना बरोबरीत सोडवला. सामन्याचा नूर पालटवलेल्या सामन्यात अफगाणिस्तानने जिंकलेला सामना बरोबरीत संपवला.

स्टब्जच्या षटकाराने दुसऱ्यांदा बरोबरी

बरोबरीनंतर सुपर ओव्हरमध्ये जो थरार अनुभवायला आला तो हृदयाचे ठोके चुकवणाराच होता. पहिल्या सुपर ओव्हरमध्ये अफगाणिस्तानने 17 धावा करत 18 धावांचे आव्हान दिले. या धावांचा पाठलाग करताना षटकार ठोकणारा डेवाल्ड ब्रेविस तिसऱ्या चेंडूवर बाद झाला. मग 3 चेंडूंत 11 धावा हव्या असताना ट्रिस्टन स्टब्जने पहिल्या दोन चेंडूवर फक्त 4, 0 असे फटके मारले. त्यामुळे शेवटच्या चेंडूवर 7 धावांची गरज असताना त्याने फारुकीला षटकार खेचत आफ्रिकेला पुन्हा बरोबरी साधून दिली.

मिलर ठरला किलर

मग दुसऱया सुपर ओव्हरमध्ये डेव्हिड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्जने तीन षटकार खेचत 23 धावा करत
अफगाणिस्तानसमोर 24 धावांचे लक्ष्य ठेवले. तेव्हा मारक्रमने फिरकीवीर केशव महाराजच्या हातात झेल देण्याचा जुगार खेळला. पहिल्या दोन चेंडूंत एक विकेट घेत महाराजने जबरदस्त सुरुवात केली. त्यानंतर पुढील चार चेंडूंवर 4 षटकारांची गरज असताना रहमान गुरबाजने सलग तीन षटकार खेचत संघाला विजयाच्या दिशेने नेले. सहावा चेंडू वाइड गेल्यामुळे
गुरबाजला 5 धावा फटकवायच्या होत्या, पण महाराजच्या अचूक फिरकीने गुरबाजला मिलरच्या हाती झेल देण्यास भाग पाडले आणि सामन्याचा नाटयपूर्ण निकाल लावला. या थरारक आणि संस्मरणीय सामन्यात आज कोणीच हरला नाही. फक्त नशीबाने एकाला विजयी केले. तो भाग्यवान दक्षिण आफ्रिकन संघ होता.