
बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका दक्षिण कोरियन महिला पर्यटकाचा विमानतळावरील कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. मात्र, या घटनेमुळे हिंदुस्थान असुरक्षित आहे असा संदेश जाऊ नये, अशी भूमिका पीडित महिलेने घेतली आहे.
कोरियन नागरिक किम सुंग क्युंग ही महिला बंगळुरूला मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. 19 जानेवारी रोजी तिची इमिग्रेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विमानतळावरील कर्मचारी अफान अहमद याने तिच्या सामानाची तपासणी करण्याच्या नावाखाली तिला थांबवले. सामानातून ‘बीप’ असा आवाज येत असल्याचे सांगत त्याने वैयक्तिक तपासणीची गरज असल्याचे तिला भासवले.
सुरक्षा प्रक्रियेचा भाग असल्याचा समज करून पीडितेने तपासणीस संमती दिली. मात्र, संबंधित कर्मचाऱ्याने तिला पुरुषांच्या स्वच्छतागृहात नेऊन हात बाजूला करून उभे राहण्यास सांगितले. त्यानंतर सुरक्षा तपासणीच्या नावाखाली तिच्या छातीला आणि खासगी अवयवांना वारंवार स्पर्श केला, तसेच मागून मिठी मारली.
या घटनेबाबत बोलताना पीडित महिलेने सांगितले की, प्रसंग चुकीचा असल्याची पूर्ण जाणीव असूनही स्वतःची सुरक्षित सुटका व्हावी म्हणून तिने शांत राहण्याचा निर्णय घेतला आणि त्वरित तेथून बाहेर पडली.
यानंतर विमानसेवा कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सिंगापूर एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी आणि विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी सहकार्य केल्याचे तिने सांगितले. तक्रार दाखल झाल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत आरोपी कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली.
घटनेमुळे मानसिक धक्का बसला असला तरी या प्रकारामुळे हिंदुस्थानबाबत नकारात्मक मत तयार झाले नसल्याचे पीडितेने स्पष्ट केले. मात्र, विमानतळासारख्या ठिकाणी अधिकाराच्या आड लपून गैरप्रकार होण्याची शक्यता असल्याचे सांगत, महिलांसाठी अधिक सुरक्षित आणि स्पष्ट तपासणी प्रक्रिया राबवण्याची गरज असल्याचे तिने नमूद केले आहे.

























































