
शिवसेनेच्या वतीने दक्षिण-मध्य मुंबईत सुरू असलेल्या सांस्कृतिक ‘कला व खेळ महोत्सव’अंतर्गत दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या, गुरुवारी सायंकाळी 7 ते 9 यादरम्यान प्रभादेवीच्या मुरारी घाग मार्गावरील चवन्नी गल्ली येथे ही स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे स्पेन येथील आर्यन ग्रुपचे स्पर्धकदेखील या स्पर्धेत सहभागी होणार आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मक वातावरणात मैत्री, आदर आणि उत्कृष्टतेचा संदेश पसरवला जाईल.
शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सांस्कृतिक कला व खेळ महोत्सव’ सुरू आहे. याअंतर्गत ही दहीहंडी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना ओरिएंटल विमा पंपनीमार्फत सुरक्षा कवच पुरवले जाणार आहेत, ज्यामुळे स्पर्धक सुरक्षितपणे आपली कौशल्ये आणि परंपरेचा आदर्श प्रदर्शित करू शकतील. ही दहीहंडी स्पर्धा कला, संस्कृती व खेळ क्षेत्रातील नवीन अध्याय लिहिणार असून विविध देशांमधील स्पर्धकांमध्ये मैत्री व आदानप्रदान वाढवण्यास हातभार लावेल. याद्वारे स्थानिक समुदायात एकात्मतेचा, आदराचा आणि सांस्कृतिक वारशाचा संदेश पसरवण्याचा उद्देश आहे. सर्व कला, संस्कृती व क्रीडाप्रेमींनी तसेच सर्व नागरिकांनी या स्पर्धेचा अनुभव घेण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


























































