
जून-जुलै महिन्यात पार पडलेल्या पहिल्यावहिल्या फिफा क्लब वर्ल्ड कपच्या यशस्वी आयोजनानंतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल पुन्हा रंगात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या नव्या फिफा पुरुष जागतिक क्रमवारीत फार मोठे बदल झाले असून 11 वर्षांनंतर स्पेन पुन्हा एकदा अव्वल स्थानी विराजमान झाला आहे, मात्र फिफा वर्ल्डकपचा विजेता अर्जेंटिनाचा संघ दोन स्थानांनी घसरला असून तिसऱया स्थानावर पोहोचला आहे. मात्र फ्रान्सने दुसऱया स्थानावर झेप घेतली आहे. ते उपविजेते ठरले होते.
अन्य महत्त्वाच्या संघांमध्ये पोर्तुगाल पाचव्या स्थानी तर क्रोएशिया नवव्या स्थानी पोहोचली आहे. ब्राझीलसुद्धा सहाव्या स्थानी घसरला आहे. जर्मनीचा संघ तर टॉप टेनमध्येही आपले स्थान राखण्यात अपयशी ठरला आहे. हा संघ आता 12 व्या क्रमांकावर आहे. त्यांना पहिल्याच विश्वचषक पात्रता फेरीत स्लोव्हाकियाकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे ऑक्टोबर 2024 नंतर प्रथमच ते टॉप-10 मधून बाहेर फेकले गेले आहेत.