विशेष – हसा आणि मस्त व्हा

>> विश्वास वसेकर

मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून पाळला जातो. याचा उगम भारतात झाला. याचा तपशील कळल्यावर अभिमान वाटेल. हास्य ही आज एक मान्यताप्राप्त उपचार पद्धती आहे. त्यामागे मदन कटारिया यांचे संशोधन आणि अथक परिश्रम आहेत. मुंबईत त्यांनीच पहिल्या हास्य मंडळाची सुरुवात केली. मदन कटारिया यांनी कृत्रिम हास्याचे पस्तीस प्रकार निर्माण केले. 1995 साली त्यांच्या हास्य उपचाराला जागतिक आरोग्य संघटनेने एक उपचार पद्धती म्हणून मान्यता दिली. 1996 साली पहिला जागतिक हास्य दिन महालक्ष्मी रेसकोर्सवर साजरा झाला. तेव्हापासून मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभर हास्य दिन साजरा होतो.

वरवर पाहता हसणे ही एक शारीरिक प्रक्रिया आहे. जोराने श्वास घेऊन आत घेतलेली हवा छातीच्या आणि पोटाच्या आकुंचन प्रसरणांच्याद्वारा तोंडाने हा हा असा आवाज करीत स्फोटाप्रमाणे बाहेर फेकणे म्हणजे हसणे. बाहेरून दिसणारे हास्य सगळय़ा माणसांत समान असले तरी हास्यनिर्मितीची मानसिक कारणे मात्र वेगवेगळी असू शकतात, असतात. बाळाच्या पोटाला, कमरेला हळुवारपणे बोटाने गुदगुली केल्याने बाळाच्या चेहऱ्यावर उमटणारे निरागस हसू, इथपासून लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या खलनायकाचे विकट हास्य, इथपर्यंत हास्याचे अनेक प्रकार आहेत. निरागस हास्य, छद्मी हास्य, तुच्छतादर्शक हास्य, खुनशी हास्य वगैरे.

मे महिन्याचा पहिला रविवार हा जागतिक हास्य दिन म्हणून पाळला जातो. याचा उगम भारतात झाला. 1995 साली मदन कटारिया यांच्या हास्य उपचाराला जागतिक आरोग्य संघटनेने एक उपचार पद्धती म्हणून मान्यता दिली. 1996 पासून मे महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभर हास्य दिन साजरा होतो. हास्य आणि स्मित यांमध्ये निश्चितपणे जातीचा फरक आहे. विल्यम मॅकडोगल हा मानसशास्त्रज्ञ म्हणतो की, स्मित हे आनंदाचा आविष्कार करणारे असते, मात्र हास्य आनंदाचा आविष्कार करणारे नसते. त्याउलट जेम्स सली याच्या मते स्मित हे अपुरे हास्य असते आणि हास्य आनंदाचाच आविष्कार करीत असते. तो पुढे म्हणतो की हास्य हे शरीरस्वास्थ्याच्या जाणिवांसह प्रत्ययाला येणारा आनंदोल्हासाच्या चित्तवृत्तीचा आकस्मिकपणे होणारा स्फोट असतो.

‘मेरा भारत महान’ हे अनेक बाबतींत मनापासून वाटत असलं तरी विनोद या महान जीवनांगाबद्दल मात्र मेरा भारत तितकासा महान नाही, हे खरेच आहे. ब्रिटिशांकडून आपण ही गोष्ट शिकलो. हळूहळू भीत-भीत मग विष्णुशास्त्री चिपळूणकर हे विनोद करायला लागले आणि श्रीपाद कृष्णांनी आपल्या विनोदी पोह्याची पुडी सोडली. तोवर समर्थांच्या प्रमेयाचा व्यत्यास करत ‘ज्याला विनोद आवडतो तो टवाळ’ अशीच धारणा होती. आजही हास्यविनोदाला आपल्याकडे तितकीशी प्रतिष्ठा नाही. चार्ली चॅप्लिनसारखं एक तरी उदाहरण आपल्या सिनेमात आहे का? उलट, आपल्याकडच्या सिनेमात जगाची भयानकता समजून सांगणाऱ्या गाण्यात- ‘हीरो से जोकर यहाँ बनना पडता है।’ अशी विधानं असतात.

मुळात आपल्या जीवनातच हास्यविनोदाला द्यावं तेवढं स्थान आपण देत नाही. बायकोनं नवऱ्यावर विनोद केला की, त्याच्या पुरुषी अहंकाराला ठेच लागते. मुलगा बापाच्या वाटेस गेला की, उद्धटपणा सिद्ध होतो. कनिष्ठ कर्मचाऱ्याने बॉसची खिल्ली उडवली की, ‘इन-सब ऑर्डिनेशन’ झालंच. विद्यार्थी असले काही करायला गेला की, ‘फार शहाणे आहात, बसा खाली!’ असे शिक्षक गुरकावतो. विषमता हे ज्या समाजव्यवस्थेचे अधिष्ठान आहे, तिथे विनोदाचे पीक निर्माण होणे मूलतच अवघड आहे. परंपरेला ज्या समाजात अतिरिक्त महत्त्व असते, तिथंही विनोदाला वाव कमीच असतो. हे लक्षात घेता, हास्यविनोदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी एतद्देशीयांनी निकराचे आणि विशेष प्रयत्न करणं अत्यावश्यक ठरतं. त्यासाठी आधी गंभीर आणि मनहूस माणसांशी फटकून वागायला शिका. शक्य झालं तर त्यांची यथाशक्ती टिंगल-टवाळी करून त्यांच्या अहंकाराचा फुगा फोडा आणि त्यांना आपल्या-माणसांच्या पातळीवर आणा.

‘जिंदगी जिंदादिली का नाम है, मुर्दादिल खाक जिया करते है’ असं शायर म्हणतो, ते ठीकच आहे. अशा मुर्दादिलांपासून स्वतला दूर ठेवण्याचं शिका. हसऱ्या माणसांच्या कळपात राहा. जो माणूस खळखळून हसतो, त्याच्या मनात दुष्टता-मलिनता राहूच शकत नाही. काही माणसे किती चपटे तोंड करून, चोरून, विचित्र दबलेल्या आवाजात किनरे हसतात! ती विकृत असायची जास्त शक्यता आहे. हसणे कसे सातमजली, नागनाथ कोत्तापल्लेंसारखे असले पाहिजे. कात्तापल्ले किंवा नारायण कुलकर्णी कवठेकर, भगवानदास वर्मा, रवींद्र किंबहुने यांसारख्या हसऱ्या माणसांच्या सहवासात तुम्हाला एखादा तास घालवता आला नि तुम्ही हसलात ना; तर तुमचा बोअरडम एक महिनाभर संपून जाईल आणि पुढचा महिनाभर फ्रेश राहाल.

हास्य हे निरोगी-प्रसन्न मनाचे लक्षण आहे, तसेच ते निरोगी प्रकृतिस्वास्थाचंही कारण आहे. खूप हसणाऱ्या माणसाला अपचन-बद्धकोष्ठता यांसारखे विकार होऊ शकत नाहीत. तुमच्या पेशी-पेशीला आणि रक्ताला विलक्षण चैतन्यमय बनवणारी ती गोष्ट आहे. तणाव, चिंता आणि मरगळ झटकून तुम्हाला प्रसन्न करणारे असे दुसरे औषध बाजारात नाही. हसण्याने सर्व शारीरिक ताण दूर होऊन शरीराचे तंतू सैल होतात आणि शरीराला विश्रांती व ताजेपण मिळते. निद्रानाशाचा विकार हसऱ्या माणसाला क्वचितच जडतो. म्हणूनच एका इंग्रजी डॉक्टराने म्हटले आहे की, एखाद्या गावात औषधाच्या पेटय़ा लादलेली वीस गाढवं नेण्यापेक्षा एक विनोदी, हसवणारा माणूस नेणे अधिक फायद्याचे ठरेल.

तुम्हाला प्रतिकूल असलेल्या माणसांत आणि परिस्थितीत परिवर्तन घडवून तुम्हाला अनुकूल करणारे हास्यविनोद ही एक जादूची कांडी आहे. अर्थात, आपल्या संस्कृतीत हास्यविनोदाची प्रतिष्ठा जेवढी आणि ज्या प्रमाणात वाढेल, त्यावर हे अवलंबून आहे; परंतु हसरा माणूस हा यशस्वी असला पाहिजे. परिस्थितीत बदल शक्य झाला नाही तरी त्याचं सामंजस्य निश्चित दांडगं असतं. त्यामुळेच सुखाचा गुणाकार आणि दुःखाचा भागाकार करून जीवनाच्या गणितात तो उत्तमपणे मार्क मिळवू शकेल.

आचार्य अत्रे यांचा ‘विनोदाचे व्याकरण’ नावाचा फार उत्तम लेख आहे. त्यात त्यांनी एका समस्येचा गमतीनेच उल्लेख केला आहे, पण समस्या आहे खरी. अत्रे म्हणतात- विनोद हा स्वत वाईट नाही, पण त्याचे नातेवाईक फार आहेत. वात्रटपणा, गावंढळपणा, चावटपणा, पांचटपणा, ग्राम्यता, अश्लीलता, बीभत्सपणा असे त्याचे नातेवाईक आहेत. त्यामुळे लोकांचे गैरसमज होतात. अत्र्यांनी खरोखरीच मर्मावर बोट ठेवलं आहे. यावर आपण काय करायचे, हा प्रश्न आहे. माझा सल्ला असा आहे की, विनोद जर त्याच्या या वाह्यात नातेवाईकांचा त्याग करायला तयार नसेल; तर या नातेवाईकांसकट त्याचा स्वीकार करा, काही बिघडत नाही. पण हास्य गमावून कोणतीच तडजोड नको. हसणे मस्टच आहे.

हसणे आवश्यक आहे, कारण ते नैसर्गिक आणि स्वाभाविक आहे. सृष्टिकर्त्यानं किंवा निर्मिकाने माणसाला दिलेले ते खास वरदान आहे. जीवनाला प्रसन्न व सुखी बनवण्यासाठी हे कौशल्य आत्मसात आणि विकसित केलेच पाहिजे. खूप खळखळून आणि मनमुराद हसा, तुमचे तुम्हाला छान वाटेल. शत्रूला हसवा, खळांची व्यंकटी सांडून जाईल. एखाद्या अपरिचिताला हसवा, तो तुमच्या अधिक जवळ येईल. एखाद्या उदास-दुःखी-कष्टी माणसाला हसवा, त्याच्या दुःखाची तीव्रता कमी होईल. निराशाग्रस्त माणसाला हसवा, त्याची आशा वाढेल. एखाद्या वृद्धाला हसवा, आपण दहा-वीस वर्षांनी तरुण झालो आहोत असे त्याला वाटेल. लहान मुलांना हसवा, त्यांचे व्यक्तिमत्त्व योग्य असे विकसित होईल. हसून जिरवल्याने जीवनातले कटू वास्तव, दुःख, दारिद्र्य़, शोषण, विषमता एका क्षणात संपून जाणार नाही, हे खरे; पण जीवनात या गोष्टी खरोखरीच असतील तर हास्यविनोदाची तिथे पराकोटीची आवश्यकता आहे. मग तर जरूर आणि खूप हसले पाहिजे.

(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)