
कोटय़वधी रुपयांच्या पीएनबी घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केलेल्या फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याची बहीण पूर्वी मोदी यांच्या मालकीच्या 66.33 कोटी रुपयांच्या मालमत्तेची सुटका करण्यास येथील विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. यामध्ये महागडी घडय़ाळे, दागिने, घर यांचा समावेश असून ही मालमत्ता पीएनबी बँकेकडे सुपूर्द करण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. पीएनबी फसवणूक प्रकरणात मोदी आणि इतरांविरुद्ध मनी लॉण्डरिंग चौकशीच्या संदर्भात पेंद्रीय तपास यंत्रणेने या मालमत्ता जप्त केल्या होत्या. पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) जप्त केलेली मालमत्ता सोडवण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला होता. थकबाकी वसूल करण्यासाठी या वस्तू लिलावाच्या माध्यमातून विकण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.