अकरावीचे दोन लाख विद्यार्थी प्रवेशाविना, आता विशेष फेरी

राज्यभरातील 9 हजार 528 महाविद्यालयांमध्ये एकूण 21 लाख 54 हजार 692 जागा उपलब्ध असूनही आतापर्यंत फक्त 12 लाख विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. 14.71 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी 2 लाख विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे शिक्षण विभागाने 11वी प्रवेशासाठी अंतिम विशेष फेरीचे आयोजन केले आहे.

23 ऑगस्ट सायंकाळी 6 पर्यंत नवीन नोंदणी करता येईल. 25 ऑगस्टला रिक्त जागांची यादी जाहीर केली जाईल. त्यानंतर 26 ते 27 ऑगस्टदरम्यान नोंदणीसह अर्जात सुधारणा करता येणार आहे. यामध्ये राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेत (ATKT) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठीही प्रवेश घेण्याची संधी आहे. अर्जाचा भाग-2 देखील याच कालावधीत भरता येईल.

अशी असेल विशेष फेरी

या विशेष फेरीत विद्यार्थ्यांना 1 ते 10 पर्यंत विद्यालयांची पसंतीक्रम यादी देता येईल. 29 ऑगस्ट रोजी प्रवेशपत्रे पोर्टलवर प्रसिद्ध केली जातील. त्याच दिवशी Student व College Login मध्ये तपशील दिसणार असून विद्यार्थ्यांना SMS द्वारेही प्रवेशाची माहिती दिली जाईल. 29 ते 30 ऑगस्टदरम्यान विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे.