
समृद्धी महामार्गावर साफसफाईचे काम करून गाडीत बसत असतानाच मागून आलेल्या भरधाव ट्रकने पिकअपला दिलेल्या धडकेत आठ महिला मजूर ठार झाल्या. कडवंची शिवारात झालेल्या या भीषण अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. मृतांपैकी चार महिला या बदनापूर तालुक्यातील निधोना येथील, तर चार महिला केळीगव्हाण येथील रहिवासी आहेत.
समृद्धी महामार्गावर साफसफाईचे काम सुरू आहे. या कामासाठी पिकअपने महिला आल्या होत्या. काम संपल्यानंतर सायंकाळी सहा वाजता परत पिकअपमध्ये बसत असताना नागपूरहून मुंबईकडे भरधाव जाणाऱया ट्रकने मागून धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की, काही महिला उडून दूर पडल्या. या अपघातात आठ महिला ठार, तर तीन महिला जखमी झाल्या. मृतांमध्ये अलकाबाई दादाराव आदमाने (45), मीना परमेश्वर आदमाने (45), कांचनबाई प्रकाश आदमाने (50), सुमनबाई कचरू आदमाने (70, सर्व रा. निधोना) तसेच लक्ष्मीबाई संतोष मदन (35), ताराबाई गहेनाजी चौधरी (60), कडुबाई रामदास मदन (55, सर्व रा. केळीगव्हाण) यांचा समावेश आहे. या अपघातात प्रयागबाई बाबासाहेब वाघ, कविता विठ्ठल चौधरी, दिनेश रंगनाथ गायकवाड यांच्यासह आणखी तिघे गंभीर जखमी झाले असून, या सर्वांता जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
एक महिन्यापूर्वीच छत्रपती संभाजीनगर जिल्हय़ात करमाडजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन मजूर ठार झाले होते. रस्ता दुरूस्तीचे काम करणारे हे मजूर जेवण करत असताना भरधाव ट्रकने त्यांना चिरडले होते. महिनाभरात झालेला हा दुसरा अपघात आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावर काम करणाऱया मजुरांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.


























































