
तब्बल 14 तासांच्या उड्डाण विलंबासाठी प्रवाशाला केवळ एक बर्गर आणि फ्राईज दिल्याप्रकरणी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने स्पाइसजेटला दणका दिला आहे. इतक्या तासांच्या विलंबासाठी ही व्यवस्था अपुरी असल्याचे सांगत आयोगाने प्रवाशाला 55 हजार रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
तक्रारदार प्रवाशाने 27 जुलै रोजी दुबईहून मुंबईला येणारी फ्लाइट बुक केली होती. मात्र तिला खूप उशीर झाला. त्या कालावधीत त्याला पुरेशा सुविधा मिळाल्या नाहीत. त्यामुळे संतापून त्याने ग्राहक आयोगात तक्रार केली होती. त्याची तक्रार ग्राह्य धरत प्रदीप कडू आणि सदस्य गौरी कापसे यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने विमान कंपनीला भरपाईचा आदेश दिला. मागील आठवड्यात दिलेल्या या निर्णयाची माहिती आज देण्यात आली. हा विलंब तांत्रिक बिघाडामुळे झाला आहे आणि या रखडपट्टीच्या कालावधीत प्रवाशांची काळजी घेणे कंपन्यांचे कर्तव्य आहे. प्रवासात असे अडथळे येऊ शकतात असे म्हणून कंपन्या कर्तव्यापासून पळ काढू शकत नाही, असे आयोगाने सुनावले.