
‘रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही’, असा डायलॉग मारणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहलगामचा हल्ला काही दिवसांतच विसरले आहेत. पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांमध्ये निष्पाप नागरिकांचे व जवानांचे रक्त वाहत असताना मोदी पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार आहेत. मोदी सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने आशिया चषकातील लढतींसाठी हिंदुस्थानी संघाला हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे देशभरात संताप व्यक्त होत आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानी हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर राबवले. सरकारने सिंधू करार स्थगित करून पाकिस्तानचे पाणी तोडण्याचा निर्णय घेतला. त्यापाठोपाठ क्रिकेटही थांबणे अपेक्षित होते. शिवसेनेने तशी जाहीर मागणी केली होती. केंद्रीय क्रीडामंत्र्यांना शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्र लिहून जनभावना मांडल्या होत्या. मात्र, मोदी सरकारने जनभावना पायदळी तुडवून हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्यांना परवानगी दिली आहे.
काय म्हणाले क्रीडा मंत्रालय?
दुरंगी क्रिकेट मालिकेसाठी हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात जाणार नाही आणि पाकिस्तानी संघाला हिंदुस्थानात खेळू देणार नाही. मात्र, दोनपेक्षा जास्त देशांमधील सामन्यांना हा नियम लागू होणार नाही. त्याबाबतीत आपण ऑलिम्पिकच्या नियमांशी बांधील आहोत. आशिया कप ही बहुरंगी स्पर्धा असल्यामुळे हिंदुस्थानी संघाला पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास आडकाठी केली जाणार नाही, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.
आशिया कपमधून बाहेर पडा – आदित्य ठाकरे
लोकांना राष्ट्रवादाची प्रमाणपत्रे देणाऱया भाजपने सपशेल निराशा केली आहे. निर्णयाचे समर्थन करताना सरकार ऑलिम्पिकच्या नियमांचा हवाला देत आहे. पण पाकिस्तानने हॉकी आशिया कपमधून माघार घेताना कोणत्या सौजन्याचे आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन केले, असा सवाल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला. हिंदुस्थानने एशिया कप स्पर्धेतून बाहेर पडावे, अशी मागणी त्यांनी केली.