पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला कांस्यपदक चार खेळाडू आणि हॉकी संघांने जिंकून दिलेत. कांस्यविजेत्या खेळाडूंना हरयाणाने अडीच कोटी तर केरळने दोन कोटींचे इनाम दिलेय, पण महाराष्ट्राचा 72 वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपविणाऱ्या नेमबाज स्वप्नील कुसाळेला राज्य सरकारने फक्त एक कोटी जाहीर केलेत. इतरांच्या तुलनेत स्वप्नीलवर दाखवलेल्या महाराष्ट्राच्या आखडत्या प्रेमामुळे त्याच्यावर अन्याय झाल्याची भावना क्रीडाप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे.राज्य सरकारने मोठय़ा दिलाने हरयाणा, केरळ सरकारप्रमाणे कुसाळेलाही दोन-अडीच कोटींचे इनाम जाहीर करावे अशी मागणी केली आहे.
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देताच खेळाडूंवर कोटींच्या बक्षीस रकमांचा अक्षरशः वर्षाव होऊ लागला. आधी हरयाणाने आपल्या खेळाडूंना छप्पर फाडके बक्षीस दिले होते. आता त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत केरळ सरकारनेही आपल्या एकमेव कांस्य पदक विजेत्या हॉकीपटू पी. आर. श्रीजेशला दोन कोटींचे रोख बक्षीस जाहीर करून त्याचा गौरव करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कांस्य पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना हरयाणासारखे क्रीडाप्रेमी राज्य अडीच कोटी रुपये देत असताना महाराष्ट्रानेही तेच करून आपल्या ऑलिम्पिकवीराचा सन्मान करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वीच हरयाणा सरकारने आपल्या पदक विजेत्या ऑलिम्पिकवीरांना रौप्य पदकासाठी चार कोटी आणि कांस्य पदकासाठी अडीच कोटींचे इनाम दिले होते. विशेष म्हणजे हिंदुस्थानला जिंकलेल्या पाच वैयक्तिक पदकांपैकी चार पदके एकटय़ा हरयाणाच्या खेळाडूंनी जिंकली होती. त्यामुळे हरयाणाने आपल्या खेळाडूंच्या कामगिरीबाबत अभिमान व्यक्त करत त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला. एवढेच नव्हे तर त्यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतलेल्या 16 खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख रुपये देऊनही गौरविले. हरयाणाच्या नीरज चोप्रा, मनू भाकर, सरबज्योत सिंग, अमन सेहरावत या खेळाडूंनी वैयक्तिक पदके जिंकली होती, तर हॉकी संघातही तीन खेळाडू हरयाणाचे होते. हरयाणाने सुवर्ण जिंकणाऱ्या खेळाडूला पाच कोटींचे इनाम जाहीर केले होते. मात्र यंदा हिंदुस्थानच्या एकालाही सुवर्ण स्पर्श करता आला नाही. तसेच त्यांनी 100 ग्रॅम वजन वाढीमुळे पदक हुकलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटचा गौरव करताना तिलाही रौप्य पदक विजेत्याला दिला जाणारा चार कोटींचा पुरस्कार दिला.
आज केरळने कांस्य जिंकणाऱ्या हॉकी संघाचा गोलरक्षक असलेल्या पी. आर. श्रीजेशला दोन कोटींचे बक्षीस जाहीर करून हरयाणासारखाच आपल्या खेळाडूचाही गौरव करण्याचे ठरविले. हिंदुस्थानला पाच खेळाडूंनीच वैयक्तिक पदक जिंकून दिले. अन्य चार खेळाडूंना अडीच आणि चार कोटी मिळाले असताना त्यांच्याच तोडीची कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या ऑलिम्पिकवीराला केवळ एक कोटी रुपये मिळाल्यामुळे स्वप्नीलवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त होत आहे. राज्य सरकारने हरयाणा आणि केरळप्रमाणे आपल्याही कांस्य पदक विजेत्या स्वप्नील कुसाळेला सन्मान राखत त्याच्या बक्षिसाची रक्कमही अडीच कोटी रुपये करावी, अशी मागणी क्रीडाप्रेमींकडून केली जात आहे.