एसटी बसस्थानके चकाचक ठेवणार; आरोग्यदायी प्रवासासाठी नव्या वर्षात दर 15 दिवसांनी स्वच्छता मोहीम

एसटी महामंडळाने नव्या वर्षात राज्यातील सर्व बसस्थानके स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याचा निर्धार केला आहे. दर 15 दिवसांनी बसस्थानकांच्या संपूर्ण आवारात तसेच प्रशासकीय इमारतींमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील दुर्गंधीचा प्रश्न दूर होणार आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी प्रवासासाठी एसटी महामंडळाने हा उपक्रम हाती घेतला आहे.

राज्यातील अनेक एसटी आगार, बसस्थानकांची दुरवस्था झाली आहे. त्यांचा कायापालट करण्याच्या दिशेने एसटी महामंडळ टप्प्याटप्प्याने पावले उचलत आहे. त्याआधी स्वच्छतेला प्राधान्य देणारा उपक्रम महामंडळाने हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत बसस्थानकातील बैठक व्यवस्था, फरशी, भिंती, काच, शौचालये, पिण्याच्या पाण्याची ठिकाणे, महिला विश्रांतीगृहे, कार्यालयीन कक्ष आदींची स्वच्छता करण्यात येणार आहे. साचलेला कचरा, अनावश्यक झाडेझुडपे, जाहिरातींचे फलक, जळमटे हटवून परिसर नीटनेटका केला जाणार आहे. प्रत्येक बसस्थानकावर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागप्रमुखांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. नवीन वर्षात एसटी प्रवास अधिक समृद्ध करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाने जाहीर केले आहे.

कचऱयाचे वर्गीकरण आणि विल्हेवाट

ग्रामीण भागात एसटी बसस्थानकांमध्ये प्रवाशांची मोठी वर्दळ असते. प्रवासी इतस्ततः कचरा फेकतात. स्वच्छता मोहीम राबवतानाच प्रवाशांमध्येही जनजागृती केली जाईल. तसेच कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डबे उपलब्ध करून कचऱयाचे योग्य प्रकारे वर्गीकरण आणि विल्हेवाट लावली जाईल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. मोहिमेत स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था, विद्यार्थी, नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.