
‘महाराष्ट्राची जीवनवाहिनी’ असलेल्या ‘लालपरी’ अर्थात एसटी बसच्या प्रवाशांवर दुहेरी भाडेवाढीचा भुर्दंड पडणार आहे. उन्हाळी सुट्टीतील 10 टक्क्यांच्या हंगामी भाडेवाढीबरोबरच एसटी महामंडळाने प्रत्येक तिकिटावर 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार कायमस्वरुपी लादण्याचा निर्णय घेतला आहे. लालपरीचा प्रवास 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण राज्यभरात महागणार आहे. ही हंगामी भाडेवाढ 15 जूनपर्यंत लागू राहणार आहे.
उन्हाळी सुट्टीत गावी जाणाऱया सामान्य प्रवाशांना या भाडेवाढीचा मोठा आर्थिक फटका बसणार असतानाच त्यात प्रत्येक तिकिटामागे दोन रुपयांचा स्वच्छता अधिभार माथी मारला जाणार आहे. हा अधिभार कायमस्वरूपी आकारला जाणार आहे. बस गाडय़ा, बस स्थानके, चालक-वाहकांची विश्रांतीगृहे, बाथरूम, शौचालय आदी परिसरात स्वच्छता ठेवण्यासाठी प्रवाशांकडून अधिभार वसूल केला जाणार आहे. अधिभार वसुलीतून पैसे जमवून स्वच्छतेच्या कंत्राटावर तीन वर्षांत तब्बल 438 कोटी 65 लाख रुपये खर्ची घातले जाणार आहेत. हंगामी भाडेवाढ आणि कायमस्वरूपी स्वच्छता अधिभार याचा एकाच वेळी भुर्दंड पडणार असल्यामुळे राज्यभरातील ‘लालपरी’च्या प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
कंत्राटदारांचे लाड
15000 बस गाडय़ा आणि 568 बस स्थानकांच्या स्वच्छतेसाठी निविदा प्रक्रियेतून ‘स्मार्ट सर्व्हिसेस’ आणि ‘क्रिस्टल’ या कंत्राटदार कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना स्वच्छतेच्या कामासाठी दरमहा 11 कोटी 60 लाख रुपये म्हणजेच वर्षभरात 139 कोटी 14 लाख रुपये दिले जाणार आहेत. दर तीन वर्षांनी स्वच्छतेसाठी नवीन एजन्सी नेमली जाणार आहे.
सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री
एसटीची 10 टक्क्यांची हंगामी भाडेवाढ केवळ साध्या बसेससाठी लागू असेल. म्हणजेच सामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. हंगामी भाडेवाढीतून हिरकणी, शयनयान, शिवशाही, जनशिवनेरी, शिवनेरी या गाडय़ांसह ई-बस गाडय़ांना वगळण्यात आले आहे. उन्हाळी सुट्टीतील प्रवासाचे आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांकडून जुन्या आणि नव्या दरातील फरकाची रक्कम एसटी प्रवासात वसूल केली जाणार आहे.





























































