मुंबई-गोवा महामार्गाने मोडले एसटी चालकांचे कंबरडे

<<< दीपक पवार

मिंधे सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी एसटी प्रवासाची सोय केली. यासोबतच देशातील सर्वाधिक काळ रखडवलेल्या आणि पावसामुळे खड्ड्यांनी प्रचंड चाळण झालेल्या मुंबई-गोवा महामार्गावरून जाताना कंबरडे मोडण्याची गॅरंटीही दिली. हा एसटी प्रवास एसटी चालकांच्या आरोग्याची प्रचंड दैना करत आहे. मोडकळीस आलेल्या आणि अतिशय जीर्ण झालेल्या एसटी गाड्या चालवताना खड्डे चुकवत, सतत ब्रेक, क्लच आणि गिअरचा वापर करताना एसटी चालकांची अक्षरशः हाडे खिळखिळी होत आहेत. मणका, पाय, कंबर आणि पाठदुखी वाढल्याने एसटी चालक प्रचंड हैराण असल्याची व्यथा त्यांनी ‘सामना’कडे मांडली.

अनेक ठिकाणी रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्यामुळे दररोज प्रचंड वाहतूककोंडीतून वाट काढावी लागते. अशा स्थितीत गाडी चालवताना पायांची वाट लागते. पोटऱ्या प्रचंड दुखतात. अशक्तपणा जाणवतो, सहा तासांच्या प्रवासाला 8 तास लागतात तर 10 तासांच्या प्रवासाला 12 तास लागतात. आराम नाही, त्यात अतिशय जीर्ण झालेल्या एसटी गाड्या चालवताना प्रचंड कसरत होते. त्यामुळे तब्येतीवर परिणाम होत असल्याचे एसटी चालक अशोक आपुसकर यांनी सांगितले.

नोकरीत पाच ते सहा वर्षे झालेल्यांनाही त्रास

नोकरीत केवळ पाच ते सहा वर्षे झालेल्या तरुण एसटी चालकांनाही आतापासूनच पाठदुखीने हैराण केले आहे. मणक्यातून अचानक कळ जाते. कंबरदुखीही वाढल्याचे एसटीचालक आदित्य शिंदे यांनी सांगितले. इतक्या कमी वयात ही अवस्था आहे मग पुढे वय वाढल्यानंतर शारीरिक त्रास किती वाढेल याची कल्पना न केलेलीच बरी, असे एसटीचालक सूर्यकांत भारेमारे यांनी सांगितले. गावात जाऊन उपचार घ्यावे लागतात, असे मुंबई ते दापोली केळशी या मार्गावर एसटी चालवणारे विकास परदेशी यांनी सांगितले.

डीझेल वाढले की अधिकारी विचारतात

मुंबई ते श्रीवर्धन या प्रवासात रस्ता चांगला असता तर 90 लिटर डीझेल पुरेसे झाले असते. परंतु, रस्त्याची दैना झाल्यामुळे 110 ते 120 लिटर डीझेल लागते. अशावेळी अधिकारी त्याबद्दल विचारतात. त्यांना सर्व हिशोब द्यावा लागतो. कारण, त्यांनाही वरिष्ठांना उत्तर द्यावे लागते. मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेमुळे लांबच्या प्रवासासाठी नेहमीपेक्षा कितीतरी अधिक डिझेल खर्ची पडते. परिणामी, एसटी तोट्यात जात असल्याचे एसटी चालकांनी सांगितले.

नागोठणे, सुकेळे खिंड, कोलाड, वरसगाव, रोह्याकडे जाणारा रस्ता, वडखळ नाका पॉईंट यादरम्यान प्रचंड खराब आहे. अनेक ठिकाणी गतिरोधकांची उंची जास्त असून ते चटकन लक्षात येत नाहीत. अशावेळी कचकन ब्रेक दाबल्यास प्रवाशांचा पारा चढतो, आम्हाला शिव्यांची लाखोली वाहातात. गडबच्या पुढे शालिमार हॉटेलपर्यंत प्रचंड कसरत होते. त्यामुळे या गतिरोधकांची उंची कमी करावी, अशी चालकांची मागणी आहे. खेडपासून संगमेश्वर ते अगदी हातखंबापर्यंत ब्रेक मारतच गाडी चालवावी लागते. अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत, त्यात रस्ताही खराब आहे. आमटेम ते नागोठणे रविवारची वाहतूककोंडी ठरलेलीच आहे. यावर उपाययोजना करावी. जिथे गाव तिथे खराब रस्ता अशी स्थिती असल्याचे एसटी चालक हणुमंत कचरे यांनी सांगितले.

एसटी स्टँड आतमध्ये अडचणीच्या ठिकाणी नकोत

अनेक ठिकाणी एसटी स्टँड आतमध्ये आहेत. तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा रस्ता छोटा आहे. म्हसळा एसटी स्टँडपर्यंत पोहोचताना प्रचंड कसरत करावी लागते. बायपास तयार झाल्याने रस्ता छोटा झाला आहे. समोरून मोटरसायकलवाला आला तरी तो आम्हाला शिव्या घालतो. रस्ता प्रचंड खराब असल्याने एसटी अक्षरशः धडधड, कडकड करतच स्टँडपर्यंत जाते. त्यामुळे एसटी स्टँड सोयीच्या ठिकाणी असावेत. जेणेकरून प्रवाशांना आणि एसटी चालकांनाही त्रास होणार नाही, असे एसटी चालक अशोक आपुसकर यांनी सांगितले.