
भाजप सरकार भ्रष्टाचार, अधिकारांचे उल्लंघन आणि प्रसारमाध्यमांवर दबाव टाकत असल्याचा आरोप तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केला. ग्लोबल प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये हिंदुस्थानची 151 व्या स्थानी घसरण झाल्यानंतर स्टॅलिन यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. भाजपचे सरकार प्रश्नांना घाबरते, त्यामुळेच ही घसरण झाली आहे. ते प्रसारमाध्यमांच्या कार्यालयांवर छापे टाकतात, पत्रकारांना तुरुंगात टाकतात, भ्रष्टाचार व अधिकारांचे उल्लंघन आणि त्यांचा खरा चेहरा उघड करणाऱ्यांना ‘गप्प’ करतात, अशी टीका त्यांनी ‘एक्स’ पोस्टमधून केली. ते पुढे म्हणाले की, निर्भय पत्रकारितेशिवाय लोकशाही अंधारात मरते. म्हणूनच आपण पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे रक्षण केले पाहिजे. केवळ प्रसारमाध्यमांनाच नव्हे तर प्रत्येक नागरिकाला सत्तेत बसलेल्यांना विचारणा करण्याचा अधिकार आहे.