अहिल्यानगर महापालिकेच्या ‘स्थायी’ सभापतीची 10 मार्चला निवड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या स्थायी समिती व महिला बालकल्याण समिती सभापती, तसेच उपसभापतिपदाच्या निवडीचा कार्यक्रम नाशिक विभागीय आयुक्तांनी जाहीर केला आहे. दि. 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महापालिकेच्या सभागृहात ही निवड होणार आहे. त्यासाठी नाशिक विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेत स्थायी समितीला आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे स्थायी समितीचे सभापतीपद आणि महिला बालकल्याण समितीचे सभापतीपद सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये कोणाच्या वाटय़ाला जाते, याची उत्सुकता आहे. स्थायी समिती सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. स्थायी समितीच्या एकूण 16 सदस्यांच्या निवडी नुकत्याच महासभेद्वारे करण्यात आल्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस 6, भाजप 6, शिवसेना 2, काँग्रेस व एमआयएम प्रत्येकी 1 असे एकूण 16 सदस्य निवडले गेले आहेत. आता स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीचा प्रोग्राम नाशिक विभागीय आयुक्तांकडून आला आहे.