
नायगाव बीडीडी प्लॉट ‘बी’ मधील रहिवाशांना लवकरच पुनर्वसन सदनिका मिळणार आहेत. त्याप्रमाणे प्लॉट ‘ए’मधील पुनर्विकास बांधकामाला तातडीने सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली नायगाव बीडीडीतील रहिवाशांच्या प्रमुख मागण्यांचे निवेदन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना देण्यात आले. यावेळी रहिवाशांच्या मागण्यांचा प्रामुख्याने विचार केला जाईल, असे आश्वासन जयस्वाल यांनी दिले.
प्रलंबित मागण्यांसाठी नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्प प्लॉट ‘ए’मधील रहिवाशांनी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई यांच्या नेतृत्वात नुकतीच म्हाडा उपाध्यक्षांची घेतली. या बैठकीत रहिवाशांच्या विविध प्रश्नांवर सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला विभागप्रमुख – आमदार महेश सावंत, माजी महापौर श्रद्धा जाधव, विधानसभा प्रमुख सुरेश कदम, संघटक राकेश देशमुख, म्हाडाचे कार्यकारी अभियंता सुनील भडांगे, काशीनाथ जोजन, माजी नगरसेविका उर्मिला पांचाळ, नायगाव बीडीडी समन्वय समितीचे सदस्य प्रशांत घाडीगावकर, संदीप चव्हाण, अनंत साळी, सचिन पाटणकर, अॅड. मनोज टपाल, महादेव पाटील, प्रदीप कदम, विजयकांत वंजारे, नंदू चव्हाण यांच्यासह रहिवासी उपस्थित होते.
स्वतंत्र पार्किंग, मैदानासाठी रहिवासी ठाम
प्रत्येक घरामागे स्वतंत्र पार्किंग द्यावी, वाढत्या महागाईनुसार रहिवाशांना 35 हजार रुपये भाडे द्यावे, रहिवाशांना करारनामा सुपूर्द केल्याशिवाय चाळी रिक्त करू नका, प्लॉट ‘ए’मधील पुनर्विकास आराखडय़ात बदल करून खेळाचे मैदान नव्याने बांधण्यात येणाऱया टॉवरच्या मध्यभागी ठेवावे, भवानी माता मंदिर व बौद्ध विहार ही धार्मिक स्थळे उद्यानात असावीत, चाळनिहाय लॉटरी काढावी, अदानीऐवजी बेस्टचे विद्युत मीटर द्यावे, नव्या इमारतीत सीसीटीव्ही तसेच खिडक्यांना लोखंडी ग्रील बसविण्यात यावे आदी मागण्या रहिवाशांकडून करण्यात आल्या.





























































