टीईटी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) अर्ज भरण्यास राज्य परीक्षा परिषदेने मुदतवाढ दिली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येईल. यामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. राज्यात मराठवाडय़ासह विविध जिह्यांत झालेल्या अतिवृष्टी, महापूर यामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यास तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती.

परीक्षा परिषदेतर्फे 23 नोव्हेंबर रोजी ‘टीईटी’ घेण्यात येणार आहे. त्यासाठी 15 सप्टेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्याची मुदत शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजीपर्यंत होती, परंतु काही जिह्यांत मोठय़ा प्रमाणावर अतिवृष्टी व पूरस्थिती निर्माण झाली होती. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूरस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले आहे. वाहतूक व्यवस्था आणि इतर तांत्रिक समस्या निर्माण झाल्या आहेत. ‘महा-टीईटी’ परीक्षा अर्ज भरण्यास अडचणी येत आहेत, अशा तक्रारी होत्या. त्यांचा विचार करून परीक्षा परिषदेने शुक्रवारी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. 9 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे, परीक्षा शुल्क भरणे यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.