
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेच्या 9 व्या राज्यस्तरीय अधिवेशनात एसटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांना हात घालत, झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी शिवसेना प्रसंगी राज्यभर आंदोलन उभारेल. कोणत्याही संघर्षात शिवसेना एसटी कामगारांच्या पाठीशी उभी असल्याचे माजी उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी ठणकावले. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा प्रश्न राज्यपातळीवर घ्यावा, अशी विनंती आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे 15 महत्त्वपूर्ण ठराव या अधिवेशनात मंजूर करण्यात आले.
घाम गाळणाऱ्या एसटी कामगारांना सरकारकडून न्याय मिळालाच पाहिजे, अशी आग्रही भूमिका शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी मांडली. यावेळी शिवसेना नेते अॅड. अनिल परब, भास्कर जाधव यांनीदेखील एसटी कामगारांच्या कल्याणार्थ मनोगते व्यक्त केली.
महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन सिंधुदुर्ग जिह्यात कुडाळ येथे नवीन एसटी डेपोच्या मैदानावर शनिवारी पार पडले. या अधिवेशनाचे उद्घाटन माजी उद्योगमंत्री तथा शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष तथा खासदार अरविंद सावंत, शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव, आमदार महेश सावंत, माजी आमदार वैभव नाईक व परशुराम उपरकर, उपनेत्या जान्हवी सावंत, जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर, कार्याध्यक्ष प्रदीप धुरंधर, कोकण विभागीय अध्यक्ष अनुप नाईक, सचिव भगवान धुरी, कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, विशालसिंग राजपुत, प्रमिला वारघडे, गंगाराम सडवेलकर व रुपेश पावसकर यांच्यासह एसटी कामगार सेनेचे सभासद, एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





























































