Marathwada Flood : अधिवेशन तोंडावर असल्यानेच बोंब नको म्हणून नाइलाजास्तव राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला, अंबादास दानवे यांचा आरोप

अधिवेशन तोंडावर असल्यानेच बोंब नको म्हणून नाइलाजास्तव राज्याने केंद्राकडे मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा प्रस्ताव पाठवला, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी महायुती सरकारवर केली आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी ही टीका केली आहे.

X वर पोस्ट करत अंबादास दानवे म्हणाले की, “मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचे पथक ३-४ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. झालेल्या नुकसानीची मोजदाद ही स्थानिक प्रशासनाकडून तातडीने राज्य सरकारला कळवली जात होती. असे असताना पथक आल्याच्या तब्बल तीन आठवड्याने मदतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणे हे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे.”

ते म्हणाले की, “अधिवेशन तोंडावर असल्यानेच बोंब नको म्हणून नाइलाजास्तव हा प्रस्ताव राज्याने केंद्राकडे पाठवला (२७/११/२०२५) आहे, असा माझा स्पष्ट आरोप आहे. अस्मानीने शेतकऱ्याला मारलेच, आता सरकारची हा तुघलगी-सुलतानी नीती बळीराजाला देशोधडीला लावत आहे. प्रस्ताव मिळाला न मिळाला याचे चित्र आज तर स्पष्ट झाले. आता मनन चिंतन करून केंद्राला दया येईल, तेव्हा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला फुटक्या कवड्या पाठवतील. पण त्यालाही रब्बी हंगाम उलटून जाणार आहे.”