बदलापूर अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यभर संताप; ठिकठिकाणी आंदोलन, रास्ता रोको, सरकारविरोधात घोषणाबाजी

बदलापूरमधील आदर्श शिक्षण संस्थेच्या एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन, रास्ता रोको, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुण्यात शिवसेनेतर्फे जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. बदलापूर अत्याचार प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवून घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मेहतर वाल्मिकी, सुदर्शन, चुडा, रुखी, लालबेक यांच्या वतीने करण्यात आली. 

महाराष्ट्राच्या लेकींवर अत्याचार करणाया नराधमावर बारा तासांनी कारवाई आणि न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या पालकांवरती लाठीचार्ज करणाऱ्या सरकारचा एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने निषेध करण्यात आला. न्याय मागणारा लेकीचा पालक असे फलक झळकावत कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. राज्य सरकार बरखास्त करावे अशी मागणी करत शिवसेनेने सोलापूरात आंदोलन केले. माढय़ात सर्व महिलांनी एकत्र येत भव्य मोर्चा काढला. राष्ट्रवादीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. कोल्हापुरात शिक्षकांनीही निषेध मोर्चा काढला.

बदलापूर अत्याचारप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांनी राजीनामा देण्याची मागणी राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली. तर पुणे शहर काँग्रेसच्या वतीनेही हीच मागणी लावून धरण्यात आली. 

कुडाळमध्ये पोलिसांना निवेदन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आम्ही निषेध करीत आहोत. या घटनेतील संशयित आरोपीला तत्काळ फाशी देण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन कुडाळ तालुका शिवसेना  पक्षाच्या वतीने येथील पोलीस निरीक्षकांकडे देण्यात आले.

मराठवाडय़ात शिवसेनेतर्फे बांगडय़ांचा आहेर

महाविकास आघाडीच्या वतीने मराठवाडाभर आंदोलन करण्यात आले. बीडमध्ये संतप्त शिवसैनिकांनी मिंधे सरकारला बांगडय़ांचा आहेर दिला. धाराशीवमध्ये सुरक्षित बहीण योजना राबवण्याची मागणी करण्यात आली. परभणीत शिवसैनिकांनी निष्क्रिय गृहमंत्री फडणवीसांना हाकलण्याची मागणी करत प्रशासनाला निवेदन दिले. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड, हिंगोलीसह धाराशिव, लातूरमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात आले.

अक्कलकोटमध्ये शिवसेनेच्या रणरागिणींनी एसटी रोखली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने महिला आघाडीच्या रणरागिणींनी अक्कलकोटमध्ये एसटी रोखली. रणरागिणींनी रास्ता रोको करून एसटी रोखून धरली आणि पोलिस निरीक्षक राजेंद्र टाकणे, उपनिरीक्षक राजू राठोड यांना निवेदन देण्यात आले. माळशिरस, नगरमध्येही संगमनेर येथेही तीव्र निदर्शने करण्यात आली. दरम्यान, महिला पत्रकाराला उद्देशून आक्षेपार्ह भाषेचा वापर करणाऱ्या वामन म्हात्रेवर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर प्रेस क्लबने केली.

मौदा तालुक्यातील निषेध मोर्चा

 मौदा तालुक्यातील महिलांनी निषेध मोर्चा काढत राज्यपालांना निवेदन दिले. यावेळी 1500 रुपये परत घ्या, पण मुलीबाळी, महिलांना संरक्षण द्या अशा भावना महिलांनी व्यक्त केल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले, भारती गोडबोले, संघटक नीता पोटपह्डे, नीलिमा घरजाळे, वर्षा पडोळे, ममता कानफाडे, प्रतिमा ठाकरे, चंदा ठाकरे, अर्चना सातपुते, वंदना हिवसे, उज्वला सुखदेवे, गीता शेबे, पुष्पा गाडबैल, विद्या गोडबोले आदी उपस्थित होत्या.

पुण्यात शिवसेनेतर्फे जनआक्रोश मूक मोर्चा

कोलकाता येथील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून केलेली निर्घृण हत्या आणि बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात आला. डॉक्टर तरुणीला न्याय मिळालाच पाहिजे, महिला, विद्यार्थिनीची सुरक्षितता यासह ‘भीक नको दीड हजारांची, खात्री हवी सुरक्षिततेची’ असे फलक झळकविण्यात आले.

शिवसेनेचा धुळय़ात निषेध मोर्चा

बदलापूर येथील शाळेत दोन बालिकांवर 13 ऑगस्टला अत्याचार झाला. पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी सोळा ऑगस्टला अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला. नंतर सफाई कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तक्रार नोंदविण्यासाठी गेलेल्या पीडित बालिकांच्या पालकांना 10 ते 11 तास पोलिस ठाण्यात बसविण्यात आले. पोलिसांची दिरंगाई हे सरकारच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे. त्या मिंधे सरकारचा आम्ही धिक्कार करतो, असे म्हणत शिवसेना पक्षातर्फे धुळयात निषेध मोर्चा काढण्यात आला.  शिवसेनेतर्फे धुळयात निषेध मोर्चा काढण्यात आला. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी ही शाळा चालविली आहे. त्यामुळे शाळा आणि गुन्हेगाराला एका अर्थाने संरक्षण देण्यात आले.लैंगिक अत्याचार, शोषण अशा गुन्हय़ांमधील गुन्हेगारांना गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पाठीशी घालत आहेत, याचा आम्ही निषेध करतो. सरकार अपयशी ठरले असुन सर्व सत्ताधाऱ्यांनी राजीनामा दयावा. या घटनेची दखल घेत बाल अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हय़ाची नोंद केली जावी आणि संबंधिताला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली.

गडहिंग्लजमध्ये विद्यार्थिनी उतरल्या आंदोलनात

गडहिंग्लज येथे शिवसेना  पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या. यावेळी ‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’, ‘गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, चंदगड विधानसभा क्षेत्रप्रमुख राजू रेडेकर, तालुका महिला संघटिका स्नेहल पाटील, शहरप्रमुख संतोष चिकोडे, सुधाकर जगताप, संदीप चव्हाण, वसंत नाईक, श्रीशैल साखरे, बाळू पुंभार, संदीप कुराडे, युवासेना जिल्हा युवा अधिकारी अवधूत पाटील, तेजस घेवडे, प्रकाश रावळ, दिगंबर पाटील, संभाजी येडूरकर, काशिनाथ गडकरी आदी उपस्थित होते.