मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भाजपचे सरचिटणीस संजय केणेकर यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने मराठा समाजात संताप व्यक्त होत असून, मराठा आंदोलकांनी आज शनिवारी केणेकर यांच्या क्रांतीचौकाजवळील कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत, त्यांचा निषेध केला. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल मराठा आंदोलक आक्रमक झाले असून, शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मराठा आंदोलक केणेकर यांच्या कार्यालयासमोर जमा झाले.
यावेळी आंदोलनकांनी घोषणाबाजी केली. ‘केणेकर यांचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय’, ‘माफी मागा- माफी मागा… केणेकर माफी मागा’, यासह इतर घोषणांनी आंदोलकांनी क्रांती चौक परिसर दणाणून सोडला. या आंदोलनादरम्यान आंदोलक व पोलिसांमध्ये काही वेळ शाब्दिक चकमक झाली. यावेळी किशोर बलांडे, सुधाकर शिंदे, बाबासाहेब डांगे, कृष्णा गाडेकर, नंदू मोठे, सुदाम गायकवाड, योगेश पाथ्रीकर, भरत भुमे, शुभम जगताप, शिवाजी काकडे, रामू पठाडे, आकाश साळुंके, संभाजी कोलते यासह इतरांची उपस्थिती होती.