मिंधे आणि भारतीय जनता पक्षाचे नेते पुतळा कोसळण्यामागची वेगवेगळी कारणे सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुतळा उभारण्याचे काम दिलेल्या कंत्राटदाराबद्दल मात्र त्यांनी मौन बाळगले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा कोसळण्यामागे वाऱ्याचा वेग कारणीभूत असल्याचे सांगून हात वर केले आहेत. भाजपा नेते व राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुतळ्यावर समुद्राच्या पाण्याची खारी हवा बसल्याने डस्ट जमा होऊन पुतळा कोसळला असे कारण सांगितले आहे. तसेच पुतळा उभारला त्यांच्यावर सुमोटो दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहितीही त्यांनी दिली.
पुतळा बनवणारा जयदीप आपटे श्रीकांत शिंदेंचा मित्र
शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या परिचयातील कल्याणचे जयदीप आपटे यांना दिले होते. आपटे हा अवघा 24 वर्षांचा तरुण. त्याला इतके मोठे पुतळे बनवण्याचा काहीच अनुभव नव्हता. त्यानंतरही त्याच्याकडे काम का सोपवले असा प्रश्न केला जात आहे.
मालवणात उद्या जनआक्रोश मोर्चा
अधिकाऱ्यांनी छत्रपतींचा पुतळा उभारतानाही टक्केवारी लाटली ही निषेधार्ह बाब आहे. त्याविरोधात बुधवारी 28 रोजी मालवण भरड नाक्यावरून भव्य जनआक्रोश मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी दिली.
देवगडात शिवसैनिकांकडून टायर जाळून निषेध
मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचे देवगडमध्ये तीव पडसाद उमटले. शिवसेनेच्या वतीने मिंधे सरकार आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करीत टायर जाळून निषेध केला. यावेळी पोलिसांनी शिवसेनेचा प्रयत्न दोनदा हाणून पाडला, मात्र पोलिसांनाही तुरी देत गुप्त मार्गाने कॉलेज नाका येथे जाऊन शिवसैनिकांनी टायर जाळून निषेध केला. सावंतवाडी येथे गांधी चौकात शिवसैनिकांनी निदर्शने केली.
पुतळा घाईत केला होता पूर्ण!
कमी वेळ असल्याने आम्ही एका रात्रीत अठरा थ्रीडी प्रिंटर आणून हा पुतळा बनवला. अगदी दोन महिन्यात हा पुतळा बनवला गेला, असे शिल्पकार जयदीप आपटे यांनी एका मुलाखतीत सांगितल्याचे समोर आले आहे. पंतप्रधानाच्या हस्ते उदघाटन होणार असल्यावर सुद्धा एवढा मोठा निष्काळजीपणा? अवघ्या 24 वर्षाच्या ठाण्याच्या शिल्पकाराला अशा कामाचा अनुभव नसताना ही त्याला हे काम कसे मिळाले? राजकीय वरदहस्त असल्याखेरीज ते शक्य नाही. तसेच महाराष्ट्र शासनाचे इतर कामे सुद्धा याच्याकडेच कशी? पंढरपूरच्या सावरकर चौकात भूवैकुंठ नावाचे शिल्पसृष्टी उभारण्याचे काम सुद्धा याच शिल्पकाराला कसे मिळाले?, असे अनेक प्रश्न शिवप्रेमी जनतेकडून विचारले जात आहेत.
बांधकाम मंत्र्यांसह अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळय़ाचा अवमान निसर्ग निर्मित नसून तो महाराष्ट्र शासन निर्मितच आहे. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर पोलीस फौजदारी कारवाई करावी आणि ज्येष्ठ तज्ञ मंडळींची समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी शिवसेना नेते विनायक राऊत यांनी केली.