मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ व यामागील जबाबदार असलेल्या प्रत्येक यंत्रणा व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने बुधवारी म्हणजे 28 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता भरड नाका ते बाजारपेठ मार्गे तहसीलदार कार्यालय, असा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. याबाबत तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना लेखी पत्र देण्यात आले आहे, अशी माहीती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.
मालवण शहरातील मेढा राजकोट परिसरात 4 डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आलेला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी अचानक कोसळल्याने तमाम शिवप्रेमी हिंदुस्थानींच्या मनात संतापाची तीव्र भावना निर्माण झाली आहे. मोठा गाजावाजा करून व अफाट खर्च करून उभारलेली ही शिवप्रतिमा अवघ्या आठ-नऊ महिन्यांतच कोसळणं होणे हे अत्यंत क्लेशदायक तर आहेच पण सबंधित यंत्रणेच्या भ्रष्टाचाराचे स्पष्ट द्योतक आहे. या दुर्दैवी प्रकाराच्या निषेधार्ह व यामागील जबाबदार असलेल्या प्रत्येक यंत्रणा व अधिकाऱ्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी तमाम शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने निषेध मोर्चा आयोजित करीत आहोत, अशी माहीती मालवण तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना पत्राद्वारे देण्यात आल्याची माहीती मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी दिली.