आईला कुत्र्याचे पिल्लू भेट देण्यासाठी चोरी

आईला आवडणाऱया सिटझू जातीचे पिल्लू भेट देण्यासाठी मुलाने चक्क सोनसाखळी चोरली आणि त्यातून आलेल्या पैशाने आईला तिचा आवडता श्वान भेट दिला. मात्र ही चोरी उघड झाल्याने तरुणाला घाटकोपर पोलिसांनी अटक केली.

घाटकोपर पश्चिमेकडील भटवाडील्या गणपती मंदिराजवळ वैशाली तिवारी (44) या पायी जात असताना मागून आलेल्या तरुणाने महिलेच्या गळय़ातील सोन्याची चेन हिसकावून नेली. याप्रकरणी तिवारी यांनी तक्रार दिल्यानंतर घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक दीपाली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि पैलास तिरमारे, उपनिरीक्षक पद्माकर पाटील तसेच कोयंडे, देवार्डे, पंक व पथकाने तत्काळ तपास सुरू केला. पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासाअंती पोलिसांनी विनायक शेळके (21) याला अटक केली. अटकेनंतर चोरीमागचे विचित्र कारण ऐकून पोलीस पण चक्रावले.

विनायककडे आईने सिटझू जातीचा कुत्रा हवा असे सांगितले. मात्र विनायक हा बेकार होता. मात्र त्याने तो हॉटेलमध्ये काम करतो असे सांगितले होते. आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी अखेर त्याने वैशाली तिवारीच्या गळय़ातील सोनसाखळी चोरली आणि आईला 25 हजाराचा श्वान भेट म्हणून दिला.