
उन्हाळी सुट्टीतील विशेष गाडय़ांचे नियोजन करताना कोकणच्या प्रवाशांना सापत्न वागणूक देणाऱया रेल्वे प्रशासनाविरोधात शिवसेनेने संसदेत ‘मराठी’तून जोरदार आवाज उठवला. उन्हाळी सुट्टीत मुंबईहून कोकणात लाखो प्रवासी जातात. असे असताना मध्य रेल्वेने इतर मार्गांच्या तुलनेत कोकणाकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले. विशेष गाडय़ांच्या नियोजनातील गंभीर विषमता पाहता ही ‘मध्य रेल्वे’ आहे की ‘उत्तर भारतीय रेल्वे’? असा प्रश्न पडतो, अशी आक्रमक भूमिका शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेत मांडली. कोकणासाठी रेल्वे गाडय़ांची संख्या वाढवण्याची आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रासोबत दुजाभाव केला जात आहे. कोविड काळात बंद केलेल्या गाडय़ा पुन्हा सुरू केल्या जात नाही. त्याऐवजी उत्तर प्रदेश, बिहारच्या गाडय़ा कायमस्वरुपी चालवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यातच उन्हाळी विशेष गाडय़ांच्या नियोजनातही मध्य रेल्वेने कोकणला सापत्न वागणूक दिली. याबाबत अरविंद सावंत यांनी लोकसभेत आक्रमक भूमिका मांडली.
दादर-रत्नागिरी पॅसेंजर ट्रेनच्या मागणीकडेही अरविंद सावंत यांनी लक्ष वेधले. दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा-रत्नागिरी करण्यात आल्याने कोकणी जनता, मराठी भाषिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. ही गाडी तातडीने पूर्ववत करण्यात यावी. उन्हाळी सुट्टीत कोकणासाठी गाडय़ा वाढवाव्यात, नांदेड-पुणे गाडी पूर्ववत सोडावी आदी मागण्यांबाबत सावंत यांनी आवाज उठवला.
‘मराठी बाणा’
अरविंद सावंत यांनी मराठीतून भूमिका मांडली. मध्य रेल्वेने बिहार, यूपीच्या तुलनेत कोकणला अत्यंत कमी उन्हाळी विशेष गाडय़ांची घोषणा केली, यावर अरविंद सावंत यांनी संताप व्यक्त केला. ‘हिंदी सक्ती’वरून जनतेत तीव्र भावना असतानाच गाडय़ांच्या बाबतीत मध्य रेल्वेने कोकणवासीय, मराठी भाषिकांवर भेदभाव केला असल्याचे त्यांनी सांगितले.
जनक्षोभ होईल
अरविंद सावंत यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले आणि कोकणाकडे जाणाऱया विशेष गाडय़ा वाढवण्याची मागणी केली. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांच्या सोईसाठी अतिरिक्त ट्रेन उपलब्ध करून देण्याचाही मुद्दा त्यांनी मांडला. मध्य रेल्वेने 19 मार्गांवर नियोजित केलेल्या जवळपास 1,500 विशेष फेऱयांपैकी तब्बल 450 फेऱया बिहारला आणि 332 फेऱया उत्तर प्रदेशला दिल्या. याउलट कोकणच्या प्रवाशांसाठी केवळ 36 फेऱयांची घोषणा केली. ही गंभीर विषमता तातडीने दूर न केल्यास कोकणवासीयांचा व्यापक जनक्षोभ आणि आंदोलनाचा भडका उडू शकतो, असा इशारा खासदार सावंत यांनी पत्राद्वारे दिला.

























































