
दिल्लीतील लाल किल्ला परिसरातून चोरी गेलेला 1 कोटींता कलश पोलिसांना सापडला आहे. तसेच कलश चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे उत्तर प्रदेशातील हापुड येथून चोराला पकडण्यात आले आहे.
धक्कादायक म्हणजे लाल किल्ल्यातून फक्त एक नव्हे तर तीन कलश चोरल्याची कबुली आरोपीने दिले आहे. या तीन पैकी सध्या एकच कलश मिळाला आहे. इतर आरोपी आणि उर्वरित दोन कलशांच्या शोधासाठी पोलिसांकडून छापेमारी सुरू आहे.
अलीकडेच दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरातील 15 ऑगस्ट पार्कमध्ये जैन समाजाचा धार्मिक अनुष्ठान कार्यक्रम सुरू होता. याच दरम्यान सोन्याचा एक मौल्यवान कलश चोरी झाला, ज्याची किंमत सुमारे 1 कोटी रुपये होती. जेव्हा तपास सुरू झाला तेव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसले की धोतर नेसलेल्या एक व्यक्ती पूजास्थळापर्यंत पोहोचला आणि संधी साधून कलश आपल्या पिशवीत ठेवून फरार झाला.
हा कलश फक्त सोने आणि रत्नांनी मढवलेला दागिना नव्हता, तर जैन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये दररोज होणाऱ्या पूजनाचा महत्त्वाचा भाग होता. यात सुमारे 760 ग्रॅम सोने आणि जवळपास 150 ग्रॅम मौल्यवान रत्नं त्यात हिरे, पाचू आणि माणिक जडवलेले होते.
आयोजन समितीचे सदस्य पुनीत जैन यांनी सांगितले की हा कलश अनेक वर्षांपासून विविध धार्मिक अनुष्ठानांमध्ये वापरला जात होता आणि दररोज पुजेवेळी मंचावर ठेवला जात असे. या मंचावर फक्त पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश दिला जात असे.