
क्रिकेटचा ताप हिंदुस्थानातच उसळतो असं तुम्हाला वाटतंय? साफ चुकीचे आहे. बांगलादेशातही लोकांच्या रक्तात क्रिकेट, बॅट, बॉल आणि भावना मिसळल्या आहेत! फरक एवढाच की तिथं संघ जिंकला की ‘बाबा, बाप रे, आमचा शेर!’ अशी आरोळी आणि हरला की त्याच संघावर ‘दगडफेक!’ अशी संतप्त प्रतिक्रिया.
अफगाणिस्तानविरुद्धच्या 3-0 च्या पराभवानंतर बांगलादेशचा संघ मायदेशी परतला, पण त्यांच्यासाठी स्वागताच्या फुलमाळा नव्हत्या, दगड होते. ढाका विमानतळावर क्रिकेटप्रेमींनी घोषणाबाजी करत संघाला जाहीर फटकारलं. काही वाहनांवर दगडफेक झाली, पोलिसांना अतिरिक्त सुरक्षा तैनात करावी लागली. म्हणजे क्रिकेटचं प्रेम इतकं की, आता ते ‘हार्ट’ नाही, ‘हार्ड’ झालंय! मेहदी हसन मिराजच्या नेतृत्वाखालील संघाने मालिकेत तीन सामन्यांत तीन पराभव पत्करले. पहिला पाच विकेट्सनी, दुसरा 81 धावांनी आणि तिसरा तर थेट 200 धावांनी! या दारुण कामगिरीनंतर बांगलादेशात संतप्त भावना उमटत होत्या. दरम्यान, अफगाणिस्तानचा विजय मात्र ऐतिहासिक. त्यांनी पहिल्यांदाच बांगलादेशचा एकदिवसीय मालिकेत धुव्वा उडवला. त्यांचा आत्मविश्वास उंच आणि बांगलादेशचा आत्मसन्मान अजून ड्रेसिंग रूममध्येच शोधतोय.