पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने नागरिकांना अन्नातून बाधा होऊ नये याची गंभीर दखल घेतली आहे. अस्वच्छतेच्या ठिकाणी तसेच अशुद्ध पाणी आणि आरोग्यास हानी पोहोचेल असे खाद्यपदार्थ विकणाऱया विव्रेत्यांवर कारवाई करणार आहे.
रस्त्यावर खाद्यपदार्थ बनवून विकणाऱ्यांची संख्या शहरात जास्त आहे. पावसाळ्यात रस्त्यावरचे खाद्यपदार्थ खाल्ल्याने अनेकांना त्रास होतो. स्वच्छतेचा अभाव, अशुद्ध पाण्याचा वापर, शिवाय आवश्यक बाबींची काळजी न घेता बरेच विव्रेते रस्त्यावर खाद्यपदार्थ विकतात. यातून रोगराई पसरून नागरिकांचे आरोग्य खराब होते. पावसाळ्यात हे प्रकार सर्रास घडत असल्याने एफडीएकडून याची दखल घेण्यात आली आहे. शिवाय अलीकडे खाद्यपदार्थांमध्ये उंदीर, झुरळ, हाताचे बोट असे काय काय भेटत असल्याने खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या सर्व बाबींची दखल एफडीएकडून घेण्यात आली आहे. रस्त्यांवर अपायकारक खाद्यपदार्थ विकणाऱ्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असल्याचे एफडीएचे सहआयुक्त शैलेश आढाव यांनी सांगितले.