
महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभाग सतत सजग आहे. तसेच परप्रांतीय नौकांमार्फत होणाऱ्या अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलत आहे. याच धोरणांतर्गत मंगळवारी पहाटे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदा मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्याच्या एका मासेमारी नौकेवर यशस्वी कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ नोव्हेंबर रोजी पहाटे पावणे चार वाजताच्या सुमारास आचरा (ता. देवगड) समोर सागरी हद्दीत सुमारे 14 वाव अंतरावर नियमित गस्तीदरम्यान ही कारवाई करण्यात आली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 तसेच सुधारित अधिनियम 2021 च्या तरतुदींनुसार ही बेकायदा मासेमारी आढळून आल्याने संबंधित नौका जप्त करण्यात आली.ही नौकामहाराष्ट्राच्या सागरी हद्दीत कोणताही वैध परवाना नसताना ट्रॉलिंगद्वारे मासेमारी करताना आढळून आली.
नौकेवर नौका तांडेलसह एकूण खलाशी उपस्थित होते. नौका ताब्यात घेऊन ती देवगड बंदरात सुरक्षितपणे आणण्यात आली आहे. नौकेवर आढळून आलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल माननीय सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांच्या न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. न्यायालयीन सुनावणीनंतर नौकामालक व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई किरण वाघमारे, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी, देवगड) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. त्यांना देवगड पोलीस ठाण्यातील पोलीस काँस्टेबल विवेक. फरांदे तसेच सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक संतोष ठुकरुल, धाकोजी खवळे, योगेश फाटक, अमित. बांदकर, भाऊ कुबल, स्वप्नील. सावजी यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग . सागर कुवेसकर* यांच्या मार्गदर्शनाखालील होती.
उल्लेखनीय बाब म्हणजे, गेल्या १५ दिवसांतील ही परप्रांतीय नौकेवर झालेली दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वीही अशाच प्रकारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कठोर कारवाई करून मत्स्यव्यवसाय विभागाने आपली सक्षमता दाखवून दिली आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या या सततच्या प्रयत्नांमुळे स्थानिक मच्छीमारांचे हित सुरक्षित राहण्याबरोबरच सागरी जैवविविधतेचे संरक्षणही होत आहे.



























































