मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी सेलिब्रेटी बोलणार…

पावसाळ्यात डास, अस्वच्छेमुळे होणाऱया आजारांना आळा घालण्यासाठी पालिका प्रतिबंधात्मक उपायांची जोरदार जनजागृती मोहीम हाती घेणार आहे. यामध्ये हिंदी-मराठी चित्रपटांतील अभिनेते, सेलिब्रेटी व्हिडीओच्या माध्यमातून सहभागी होणार असून ‘भाग मच्छर भाग’ अशी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेला सहकार्य करण्याचे आवाहन पालिकेने मुंबईकरांना केले आहे.

मुंबईत जनजागृतीसाठी राबविण्यात येणाऱया ‘भाग मच्छर भाग’ मोहिमेत नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन हिवताप, डेंग्यूसारख्या आजारांचे मुंबईतून निर्मूलन करण्यास मदत करावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केले आहे. पावसाळी आजाराबाबत जनजागृती करण्यासोबतच हिवताप आणि डेंग्यूबाबतीत विशेष उपाययोजना, उपक्रम राबविण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिले होते. याचाच एक भाग म्हणून मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आणि सेलिब्रिटी, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या मदतीने दृकशाव्य (व्हिडीओ संदेश) फिल्म, फोटो आदींच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे.

पावसाळी आजार रोखण्यासाठी…
– घरामध्ये, घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचलेले असणार नाही, याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यातच डासांची मादी अंडी घालते व डासांची उत्पत्ती स्थळे तयार होतात ही बाब लक्षात घेता साचलेले पाणी आढळून आल्यास असता तात्काळ निचरा करावा.
– टायर, नारळाच्या करवंटय़ा, प्लास्टिकच्या बाटल्या व बाटल्यांची झाकणे, झाडांच्या कुंडय़ा व त्या कुंडय़ाखालील तबकडी, फ्रीजच्या खालील डिफ्रॉस्ट ट्रे यामध्ये पाणी साचून राहणार नाही, याची दररोज पाहणी करावी व दक्षता घ्यावी.
– फेंगशुई, मनी प्लांट यासारख्या शोभेच्या रोपटय़ांचे पाणी नियमितपणे बदलावे. दिवसा आणि रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करावा.