
सूरतच्या रस्त्यांवर धावणारी अनोखी बाईक सध्या चर्चेचा विषय आहे. मोठमोठे हबलेस व्हिल, हटके सीटिंग पोझिशन, आणि कोणताही आवाज न करता रस्त्यावर सुसाट जाणारी बाईक बघून कुणीही दोन क्षण थांबतं. हॉलीवूडच्या एखाद्या सायन्स फिक्शन फिल्मची आठवण करून देणारी ही बाईक आहे.
सूरत येथील इंजिनीयर विद्यार्थ्यांनी ही एआय पॉवर्ड हबलेस ड्रायव्हरलेस मोटरसायकल बनवली आहे. इंजिनीयरिंगच्या तिसऱ्या वर्षाला शिकणारा शिवम मौर्या म्हणाला, आम्हाला अशी बाईक बनवायची होती, जी 10-15 वर्षांनंतरही राहील आणि सामान्य लोकांच्या गरजांचा विचार करेल. म्हणूनच आम्ही हबलेस ड्रायव्हरलेस बाईकवर काम करायला सुरुवात केली. या प्रोजेक्टमध्ये माझे मित्र गुरुप्रीत अरोरा आणि गणेश सामील झाले. गुरप्रीतनने बाईकच्या डिझाईनची जबाबदारी घेतलेय. गणेश एडिटिंग वर्क बघतोय. या बाईकला आम्ही ‘गरुड’ असे नाव दिलंय.
तिघा इंजिनीयरच्या विद्यार्थ्यांना ही हट के बाईक तयार करायला वर्षभराचा कालावधी लागला. त्यासाठी वर्कशॉपमध्ये तयार होतील असे सुटे पार्टस् त्यांनी वापरले. मात्र चाकं, अलॉय व्हिल, इलेक्ट्रिक मोटार, कंट्रोलर यासारखे पार्टस् बाजारातून आणले.
सध्या हे प्रोटोटाईप मॉडेल आहे. ती मॅन्युअली किंवा रिमोटने विना ड्रायव्हर चालवता येईल. बाईक धावताना 12 फूट अंतरापर्यंत व्यक्ती किंवा काही अडथळा आल्यास बाईकचा वेग आपोआप कमी होतो. ऑब्जेक्ट तीन फुटांच्या अंतरापर्यंत आल्यास ऑटोमॅटिक ब्रेक लागेल.