कापूर पडलेल्या तेलातील समोसा खाल्ल्याने बाधला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपरच्या केव्हीके शाळेच्या कॅण्टीनमध्ये कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्ल्यामुळेच विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. याबाबत शाळा प्रशासनानेच खुलासा जाहीर केला आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराला कॅण्टीनमध्ये स्वच्छता राखून सकस आहार पुरवण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.

घाटकोपर पश्चिमेकडील ‘केव्हीके’ खासगी शाळेमध्ये सोमवारी  कॅण्टीनमधील समोसा खाल्ल्यानंतर 20 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना घडली होती. पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. यामध्ये पाच विद्यार्थ्यांना पोटदुखी, उलटीचा त्रास झाल्याने उपचारासाठी पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही विषबाधा विद्यार्थ्यांना नेमकी कशामुळे झाली, याची चौकशी आणि तपास सुरू करण्यात आला होता. यानुसार कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्ल्याने विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार पालिकेनेही संबंधित कॅण्टीनचालकाला फूडसेफ्टीचे नियम पाळण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.

कॅण्टीन चालकावर अखेर गुन्हा

मुलांना विषबाधा झाल्याच्या पार्श्वभूमीवर कॅण्टीनमधील सर्व पदार्थांचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. त्यानुसार आलेल्या अहवालानुसार शाळेचा कॅण्टीन मालक आणि चालक सुंदर गोपाल देवाडिगा (63) याच्या विरोधात हलगर्जी आणि निष्काळजीपणाबद्दल घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.