स्वानंदाच्या  पलीकडले…

 

>> निनाद पाटील

आयुष्याच्या प्रवासात आपल्याला अगणित माणसे भेटतात. काही माणसांना आपण विसरून जातो आणि काही आपल्याही नकळत आपल्या लक्षात राहतात. किंबहुना, केवळ लक्षातच राहत नाहीत तर ती आपल्या मनात घर करून राहतात

 प्रेरणादायी वल्लरी

लहानपणी बोटे वळत नव्हती तेव्हा पत्ते, कॅरम असे वेगवेगळे खेळ नव्हे, तर प्रयोग करून वल्लरीच्या आईबाबांनी तिच्या  बोटांमध्ये शक्ती फुंकली. आजदेखील तिला स्वतःचं काही करता येत नाही. सारं सारं करतात आईवडील, पण आज तिच्यात इतकी पराकोटीची जिद्द आहे की, स्वतःच्या वयस्कर आईवडिलांना मी सांभाळेन असे म्हणताना तिच्या डोळय़ांतली चमक व आत्मविश्वास हा पाहणाऱयाला हजार हत्तींचे बळ देऊन जातो, प्रेरित करतो.

 माझ्या व्यावसायिक प्रवासात ‘आम्ही असू लाडके’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कोल्हापूरला चेतना विकास मंदिरमधील विद्यार्थ्यांसोबत मी जवळ जवळ महिनाभर होतो. सांगायचा मुख्य मुद्दा असा की, ती साधी मुले किंवा सामान्य मुले नसून ती स्पेशल चाइल्ड होती. निखिल, गणेश आणि अशी अनेक मुले. आयुष्य समरसून कसे जगायचे, आलेल्या प्रत्येक क्षणाला उत्सव बनवून तो कसा साजरा करायचा हे मी त्यांच्याकडून शिकलो. बहुतेकांना सवय असते सतत कुरबुर करायची, आपल्या दुःखांचा बाऊ करायची, संकटांना ओंजारत गोंजारत बसायची, जाणीवपूर्वक दुःखाचे कढ आणायची, पण ही सारी मुले यातले काहीही करत नव्हती. या मुलांसोबत राहिल्यावर मी स्वतःला 360 अंशात बदलून टाकले. बदलून टाकणे म्हणण्यापेक्षा माझ्याही नकळत मी बदललो आणि हा बदल सकारात्मक आणि सुखावणारा होता… हवाहवासा होता.

मी पाहिले की, दररोज नेमून दिलेल्या वेळेला उठणे, आपले जेवण झाले की, ताट, वाटी भांडी स्वच्छ धुऊन पुसून जागेवर ठेवणे, तेही ढकलाढकली, रेटारेटी न करता शिस्तीने. साध्या सतरंजीवर बसायचे असेल तर चप्पल काढून बसणे, कचरा कचरा पेटीतच टाकणे, स्वतःचे अंथरुण, गाद्या व्यवस्थित रचून ठेवणे… एक ना अनेक कामे ती मुले इतक्या सराईतपणे आणि शिस्तीने करत होती की, पाहणारी व्यक्ती अचंबित व्हावी.

आजही कोल्हापूरला गेलो की, मी आठवणीने त्या शाळेत जातो. पुन्हा नव्याने त्यांच्याकडून काही ना काहीतरी शिकत असतो.   त्या भेटीतून मिळणारा आनंद, किंबहुना स्वानंद शब्दांच्या पलीकडले असतो हे मात्र नक्की.

वल्लरी नावाची सांगलीला राहणारी मुलगी. तिला मेंदूचा एक आजार आहे. नीलकांती पाटेकर यांच्या ‘लाइफ इज ब्युटिफूल’ या शॉर्टफिल्मच्या निमित्ताने वल्लरीला भेटायला गेलो होतो. तिला पाहिल्यावर, भेटल्यावर मी निःशब्द झालो. ती सहा महिन्यांची असताना तिच्या आईवडिलांना तिच्या आजाराविषयी कळले. एखादी गोष्ट करायची असेल तर तिला मेंदूकडून संवेदना पोहोचत नाहीत. अगदी आपण हाडामांसाचा गोळा म्हणतो ना, तसेच आहे तिचे. नवस, गंडे व धागेदोरे या सगळय़ा जंजाळात न अडकता तिच्या आईवडिलांनी तिला जिद्दीने, चिकाटीने आणि अपरिमित परिश्रम करून वाढवले. वाढवले म्हणण्यापेक्षा समाजाला तिच्याकडे मान उंचावून पहावे लागेल इतके मोङ्गे केले तिला. जर कोणाला वाटत असेल ना, परमेश्वराला भेटावे, तर त्यांनी तिच्या आईवडिलांना जाऊन भेटावे. कौतुकाची आणि अभिमानाची बाब अशी की, वल्लरीला त्यांनी शिकवून व तिने मेहनतीने संस्कृतमध्ये गोल्ड मेडल मिळवले. साधीसोपी गोष्ट नाहीये ही! एक शब्दात मांडता न येणारा सकारात्मक ऊर्जेचा स्रोत त्या साऱयांच्या मनात आणि घरात आहे. संपूर्ण दिवस त्यांच्या सोबत घालवून जेव्हा मी त्यांच्या घराच्या उंबरठ्याबाहेर पडलो तेव्हा बाहेर अंधार होता, रात्र  झाली होती, पण माझ्या मनात मात्र एक नवी सोनपहाट झाली होती, सकारात्मक ऊर्जेची!