
पालिकेच्या परळ येथील केईएम रुग्णालयाने हृदय प्रत्यारोपण करून रुग्णाला जीवनदान दिले आहे. पालिका रुग्णालयात अशी क्लिष्ट शस्त्रक्रिया करणारे केईएम रुग्णालय देशातील पहिलेच रुग्णालय ठरले आहे. यामुळे केईएम रुग्णालयात हृदय आणि यकृत प्रत्यारोपण उपक्रमांनाही आता वेगाने चालना मिळणार आहे.
केईएम रुग्णालयामध्ये सन 1963-64 मध्ये पहिल्यांदा हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दुर्दैवाने ती यशस्वी होऊ शकली नाही. त्यामुळे त्यानंतरची अनेक दशके प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करता आल्या नाहीत. ही बाब अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर हा विषय प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. या हृदय शस्त्रक्रियेसाठी आवश्यक उपकरणे आणि सामग्री खरेदी करण्यात आली. यासाठी डॉ. सुधाकर शिंदे यांनी तब्बल 40 पेक्षा जास्त बैठका घेऊन हा उपक्रम राबविण्यासाठी तसेच त्यासाठी आवश्यक सर्व उपकरणे घेण्यासाठी पाठपुरावा केला. त्यानंतर 20 पेक्षा जास्त अत्यंत उच्च दर्जाची वैद्यकीय उपकरणे घेऊन तसेच अत्यंत अनुभवी आणि समर्पक वैद्यकीय चमूंच्या सहाय्याने सुसज्ज विभाग कार्यान्वित करण्यात आला. या हृदयाच्या अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रियेचे गांभीर्य लक्षात घेता हृदय प्रत्यारोपण उपक्रम सुरू करण्यासाठी तज्ञ आणि अनुभवी वैद्यकीय चमूची आवश्यकता होती. यासाठी हृदय विकारासंबंधीत तज्ञ तसेच अत्यंत अनुभवी असलेले डॉ. प्रवीण कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
या टीमने उचलली जबाबदारी
दरम्यान, हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी हृदय शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. उदय जाधव, केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत, सर्व डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय, समुपदेशक आणि संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱयांनी मेहनत घेतली. हृदय प्रत्यारोपण करण्यासाठी खासगी रुग्णालयात साधारणतः खर्च रुपये 35 लाख इतका येतो. तथापि पालिका रुग्णालयात हा खर्च 8 लाख रुपये इतका असेल.