
इस्रो अर्थात हिंदुस्थानी अंतराळ संशोधन संस्थेने इतिहास रचला असून देशवासीयांना नववर्षाची भेट दिली आहे. आज रात्री 10 वाजण्याच्या सुमारास श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी-60 द्वारे स्पेडेक्सचे यशस्वी प्रक्षेपण केले. अमेरिका, रशिया आणि चीननंतर अशाप्रकारची यशस्वी मोहीम राबवणारा हिंदुस्थान हा चौथा देश बनला आहे. अंतराळातील डॉकिंग प्रणालीत किंवा दोन उपग्रह जोडणीत इस्रोने नवा इतिहास घडवला आहे.
स्पेडेक्स मोहिमेत दोन लहान अंतराळ यानांचा समावेश असेल. प्रत्येकाचे वजन सुमारे 220 किलो असेल. हे एकाचवेळी पीएसएलव्ही- सी 60 रॉकेटद्वारे 55 अंशावर झुकलेल्या कक्षेत 470 किमी उंचीवर सोडले जातील. प्रक्षेपणानंतर दोन्ही अंतराळ याने 10 ते 20 किमी अंतर राखून हळूहळू एकमेकांच्या जवळ येतील. हे दोन्ही यान अंतराळत पुन्हा जोडली जातील. या प्रक्रियेला डॉकिंग म्हणतात. तर अंतराळातच दोन्ही यान वेगवेगळी करण्याच्या प्रक्रियेला अनडॉकिंग म्हणतात. इस्रो या मोहिमेच्या माध्यमातून डॉकिंग आणि अनडॉकिंग तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर करणार आहे.