बुलढाणा जिल्हा कडकडीत बंद

516

सामना प्रतिनिधी । बुलढाणा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज गुरुवारी पुकारलेल्या बंदला बुलढाणा जिल्ह्यातील तेराही तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. बाजारपेठ संपूर्णपणे बंद होती. शाळेला सुटी देण्यात आली होती. कर्मचार्‍यांच्या संपामुळे कार्यालयात देखिल शुकशुकाट होता. तर एसटी बसेस संपूर्णपणे बंद होत्या. या बंदमुळे जणुकाही संचारबंदी सदृश्य परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यात पहावयास मिळाली. जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, मेहकर, लोणार, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, मोताळा, मलकापूर, नांदुरा, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगावजामोद या तेरा तालुक्यात जनतेनेच स्वयंस्फूर्तीने बंद पाळला. कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

बुलढाण्यात चांगला प्रतिसाद
बुलढाणा – मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या समन्वय समितीने ९ ऑगष्ट क्रांतीदिनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. या बंदला बुलढाणा शहरात चांगला प्रतिसाद मिळाला.
सकाळी ९ वाजता सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते हुतात्मा सिध्देश्वर गोरे स्मारक या ठिकाणी एकत्र आले. हुतात्म्यांना पुष्पांजली व आदरांजली वाहुन सगळ्यांनी शांततेत आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरुन मोटरसायकल रॅली काढुन सर्वांनी बंदमधे सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. यानंतर जयस्तंभ चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. यात विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची का आवश्यकता आहे यावर आपली मत मांडली. बंदच्या दरम्यान शहरात अ‍ॅटो, कालीपीली, एस.टी. बस वाहतुक पुर्णत: बंद होती. मुख्य बाजारपेठ, इकबाल चौकातील दुकाने, संगमचौक, जिजामाता व्यापारी संकुल यांचेसह शहरातील सर्वच भागातील व्यापार्‍यांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवुन मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पाठींबा दर्शवला. याप्रसंगी चोख पोलीस बंदोबस्त शहरात सगळीकडे ठेवण्यात आला होता. बुलढाणा बसस्थानकावर दिवसभर शुकशुकाट होता. बुलढाणा डेपोमधे एस.टी. बसेस उभ्या होत्या. एसटीच्या बाहेर गावच्या डेपोतील बसच्या चालक व वाहकांसाठी स्थानिक चालक व वाहकांनी नाश्ता व भोजनाची व्यवस्था केली होती.

मराठा क्रांती मोर्चाचा चिखलीत कडकडीत बंद
चिखली – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आजच्या बंदला चिखली येथे १०० टक्के प्रतिसाद मिळाला. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅलीद्वारे शहरातील प्रमुख मार्गावरुन फेरफटका मारुन सर्वांना बंदचे आवाहन केले. काही कार्यकर्ते खामगाव चौफुलीवर ठिय्या आंदोलनास बसले होते. दोन दिवसापासून अ‍ॅटोद्वारे बंदचे आवाहन करण्यात आल्याने सर्व व्यापारी, पतसंस्था, बँका, एसटी बसेस, काही पिवळी, भाजीपाला व किरकोळ व्यापार्‍यांनी बंदला प्रतिसाद दिला.

लोणार शहरात बंदला चांगला प्रतिसाद
लोणार – मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असताना आज लोणार शहरात व्यापार्‍यांनी आपआपली प्रतिष्ठाणे शंभर टक्के बंद ठेवून चांगला प्रतिसाद दिला. शहरातील सर्वच पक्षांतील मराठा बांधव या बंदमध्ये सहभागी झालेले होते. शहरात बंद शंभर टक्के शांततेत यशस्वी झाला असून या ठिकाणी कुठलीच अनुचित घटना घडली नाही. शहरातील शाळा महाविद्यालयांना जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकार्‍यांनी सुट्टी जाहीर केलेली होती. परिवहन महामंडळाच्या बसेस शंभर टक्के बंद होत्या. शासकीय कार्यालये वगळता संपूर्ण कडकडीत बंद पाळण्यात आला. पोलीस बंदोबस्तासह पालिकेच्या अग्निशमन गाड्याही सज्ज होत्या.

मेहकर शहरासह तालुक्यात अभूतपूर्व बंद
मेहकर – मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, शेतकर्‍यांच्या शेतमालाला दीडपट भाव मिळालेच पाहिजे. या व आदी मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद का मेहकर शहर आणि तालुक्यात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून संपूर्ण शहरात आणि तालुक्यातील गावागावामध्ये शुकशुकाट दिसत आहे.
आज सकाळी ९ वाजता मराठा समाजबांधव एकत्रित येत जिजाऊ चौकात राष्ट्रगीत घेण्यात आले आणि राष्ट्रगीत झाल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलनात शहीद झालेल्या शाहिदाना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली आणि नंतर समाज बांधव, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे, जय जिजाऊ, जय शिवराय, असे कसे भेटत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा घोषणा देत शहराच्या प्रमुख मार्गाने फेरी मारण्यात आली, शहरात व्यापारी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली होती, तर शहरातील पेट्रोल पंप देखील बंद स्वतःहून बंद ठेवले होते, आजचा बंद हा यापूर्वीच्या इतिहासातील अभूतपूर्व बंद ठरला. दरम्यान जिजाऊ चौकात आंदोलनकर्त्यांनी चक्का जाम करत खाली बसूनच मुंडन आंदोलन सुरू केले. ड्रायव्हर युनियनच्या २१ सदस्यांनी, सेठी पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांनी मुंडन केले तर विशेष म्हणजे आमदार डॉ. संजय रायमूलकर, नगराध्यक्ष कासम गवळी, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष निसार अन्सारी, शिवसेना तालुका प्रमुख सुरेशतात्या वाळूकर यांनी जिजाऊ चौकात मुंडन करून या आंदोलनाला व्यक्तिगत, समाजाचा आणि पक्षाचा पाठिंबा व्यक्त केला, तर माहेश्वरी समाजाच्या वतीने विशाल काबरा, तेली समाजाच्या वतीने नागेश सोनुने, गोसावी समाजाच्या वतीने विजय गिरी यांनीही मुंडन करून पाठिंबा दिला तर मेहकर वकील संघ यांनीही निवेदन देऊन आपला पाठिंबा जाहीर केला तर मागासवर्गीय समाजाच्या वतीने भीमशक्तीचे वैâलास सुखदाने, माजी नपा सदस्य शैलेश बावस्कर यांनी पाठिंबा दिला. मराठ्यांच्या न्याय मागण्या पूर्ण करण्याची सद्बुद्धी या फडणवीस सरकारला द्या असे साकडे आज आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवाजी उद्यानात घातले.

चक्का जाम अन रुग्णवाहिका
अंत्री देशमुख येथील ग्रामस्थानी सकाळपासूनच मेहकर बायपासवरील विलासराव देशमुख चौकात चक्का जाम केला, या दरम्यान आलेल्या रुग्णवाहिकाना विनाविलंब रस्ता मोकळा करून देत आपल्यातील सामाजिक संवेदनेचे दर्शन घडविले तर जिजाऊ चौक मेहकर, खंडाळा देवी, आरेगाव, डोंणगाव, हिवरा आश्रम येथे चक्का जाम करण्यात आला. बंदचे आवाहन करण्याच्या अनुषंगाने गावातून फेरी मारल्यानंतर आंदोलनकर्ते मराठे शिवाजी उद्यानात एकत्रित आले त्यावेळी हे साकडे घातले.

शुक्रवारपासून आरक्षणासाठी उपोषण
मराठ्यांना आरक्षण मिळावे, शेतमालाला दीडपट भाव द्यावा या व इतर मागण्यासाठी विजय पवार हे जिजाऊ चौकात शुक्रवार १० आगस्ट पासून उपोषणाला सुरुवात करणार असून या उपोषणाला पाठिंबा म्हणून शनिवार ११ आगस्ट पासून साखळी उपोषण करण्यात येणार आहे.

मलकापूर शहरात कडकडीत बंद
मलकापूर -मराठा समाजाला तात्काळ आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या अनुषंगाने मलकापूर शहरातही दिवसभर १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला. यासह दसरखेडस्थित एमआयडीसी परिसरातील सर्व उद्योगांनीही बंद पाळला. सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी शिवाजी नगर येथून पंचमुखी हनुमान मंदिर परिसरापर्यंत आरक्षणाच्या घोषणा देत तेथून पुन्हा तहसील चौक येथे येत ठिय्या आंदोलन करीत शासनाला जागे करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदमध्ये शहरातील सर्व व्यापारी, महाविद्यालये, विद्यालये, शाळा, अनेक पतसंस्था आदींनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदमध्ये सहभाग घेतला. तर विविध सामाजिक संघटना, विविध समाज, विविध पक्षाच्या वतीने या बंदला ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी जाहीररित्या पाठींबा देण्यात आला. मलकापूरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने आज सकाळी ९.३० वा. दरम्यान सर्वप्रथम कु.गौरी जितेंद्र टिप या चिमुकलीच्या हाताने आई तुळजाभवानीचे पुजन व शिवरायांच्या पुतळ्याचे पुजन करून माल्यार्पण करण्यात आले. तद्नंतर राष्ट्रगित व आरक्षणासाठी शहीद झालेल्या हुतात्म्यांना तसेच देशासाठी शहीद झालेल्या कौस्तुभ राणे यांना सकल मराठा समाजाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.

शहर व तालुक्यातील जमलेल्या सर्व सकल मराठा समाज बांधवांनी तेथून बुलडाणा रोडने पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत आरक्षणासाठी घोषणा देत रस्त्यावर फिरून शासनाला जागेचा प्रयत्न केला. तद्नंतर सर्व समाज बांधवांनी तहसील चौकात जमा होत ठिय्या आंदोलन केले. यावेळी अनेक मान्यवरांसह विविध राजकीय पक्षातील नेतेमंडळी, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनीही ठिय्या आंदोलनात भाग घेतला. तर याठिकाणी विविध समाज, सामाजिक संघटना यांनी निवेदन देवून या ठिय्या आंदोलनाला पाठींबा दिला. यामध्ये सकल मुस्लीम समाज, सिंधी समाज, लेवापाटील समाज व भ्रातृमंडळ, मुस्लीम आरक्षण संघर्ष समिती, श्रीसंत श्रेष्ठ सेनाजी महाराज नाभिक सेवामंडळ, महाराष्ट्र राज्य परिट समाज, मलकापूर वकील संघ, माळवी सोनार समाज, वैदू समाज, विदर्भ राज्य आंदोलन समिती आदींसह अनेकांनी पाठींबा दिला. तर आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या जिल्ह्यातील नदू बोरसे या तरूणाच्या कुटुंबाला मदत म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने अनेकांनी यावेळी आर्थिक निधी गोळा केला. याठिकाणी नितीन अहीर महाराज, विशाल खोले पाटील महाराज यांनी मार्गदर्शन व शिवव्याख्यानाने उपस्थित तरूणांना संबोधीत केले. तर सदानंद जाधव, विठ्ठलराव पवार, विजय गायकवाड (यशवंत नगर), सुपडा देठे, राजू शेंडे यांनी शिवगिते सादर केली. यानंतर सकल मराठा समाजाच्या माता-भगिणींच्या हस्ते उपविभागीय अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. सकाळ पासूनच मलकापूर शहरात १०० टक्के बंद पाळण्यात आला. यात व्यापारी, शाळा, महाविद्यालये, अनेक पतसंस्था, बँका, काळी-पिवळी संघटना, ऑटो चालक-मालक संघटना, चारचाकी चालक-मालक संघटना आदींसह शहरातील सर्व नागरिकांसह तालुक्यातील दसरखेड परिसरस्थित एमआयडीसी मधील सर्व उद्योगांनी आपले उद्योगधंदे बंद ठेवून आज बंद पाळला. तर तालुक्यात काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग ६ सह विविध रस्ते सकल मराठा समाजाच्या आंदोलकांनी बंद केले होते.

जळगांवजामोद
अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील आर्थिक मागसलेला मराठा समाज आरक्षणासाठी लढत आहे यापुर्वीही मराठा समाजाने राज्यभरात ५८ लाखोंच्या संख्येने मुकमोर्चे काढले. शांतता आणि सयंमाचा समाजाने संपुर्ण देशाला एक आदर्श घालुन दिला होता. मात्र राज्यातील झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला मुकमोर्च्यांनी जाग आली नाही. म्हणूनच महाराष्ट्र तील सकल मराठा समाजाच्या वतीने आता मूक नाही ठोक मोर्चे काढण्यास या राज्य सरकारने मराठा समाजाला मजबूर केले आहे म्हणून आज ९ ऑगस्ट क्रांती दिनी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करीत बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव जामोद येथे सर्व जनतेने या बंदात सहभागी होण्याचे आवाहन स्वीकारीत आयोजकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेगावमध्ये बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शेगांवात सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद झालेला आहे.

कडकडीत बंद
शेगांव  – आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाकडून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला शेगांवात सुरुवात झाली असून शहरातील बहुतांश भाग पूर्ण बंद आहे. शिवाजी चौकामध्ये मराठा आंदोलकांनी रस्ता रोको केला असून, बसस्थानकावरील बस सेवा बंद आहे. संपूर्ण शहरात आणि संवेदनशील भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मराठा मोर्चाच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता अबाधित राहण्याकरिता काल जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी दिलेल्या आदेशानुसार मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम १४२ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून जिल्ह्यामधील सर्व दारूची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. आज शहरात मराठा युवकांनी शहरातील मुख्य चौकासह बाह्यभागातील रस्त्यावर जाम करण्यात आला केला आहे.  शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी मराठा क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात ५८ मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे.  संपूर्ण महाराष्ट्रसह बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये बंद पाडण्यात आला आहे. त्यामध्ये शेगाव शहरासह तालुक्यात ही ग्रामीण भागात बंद पाडण्यात आलेला आहे.

देऊळगावराजा तालुका कडकडीत बंद
देऊळगावराजा – महाराष्ट्र बंदच्या हाकेला येथील सकल मराठा समाजासह सर्वच समाजाकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला असून शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. आरक्षणासाठीच्या मागणीसाठी मराठा समाजाने तालुका बंदची हाक दिली. या हाकेला साथ देत देऊळगावराजा शहरातील व्यापार्‍यांनी आपआपली प्रतिष्ठाणे स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली. शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. मोर्चाची सुरुवात दुचाकी रॅलीने करण्यात आली. सरकार विरोधी घोषणा देत रॅलीत मराठा बांधव सहभागी झाले होते. मराठा समाजाचे १४५ आमदार आहे आणि समाजासाठी काहीच करीत नाही म्हणून शहरातील १४५ युवकांनी त्याचे श्राद्ध घालीत आपली मुंडण करुन आमदारांचा निषेध केला. शहरात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.

सिंदखेडराजा येथे कडकडीत बंद
सिंदखेडराजा – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला तालुक्यात अत्यंत उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे संपूर्ण तालुका कडकडीत बंद ठेवण्यात आल्याचे चित्र होते. बससेवा, शाळा, व्यापारी प्रतिष्ठाने, भुसार बाजार, कापड दुकाने, रेडीमेड स्टोअर्स तथा किराणा दुकाने, कृषीसेवा केंद्रे, जि. प. शाळा, माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालये बंद ठेवण्यात आली. महाराष्ट्र बंदमुळे जनजीवन विस्कळीत झालेले व दळणवळण ठप्प झालेले दिसून आले. अगदी खाजगी काळी-पिवळी, ऑटो, मिनी बस देखील प्रवाशाअभावी धावल्या नाहीत. इंग्रजी शाळांमध्ये देखील सुटी देण्यात आली होती. सिंदखेडराजा येथे सकल मराठा समाजातील स्त्री, पुरुष व बालकांनी एकत्र येत सकाळी जिजाऊ माँ साहेबांच्या राजवाड्यासमोरुन रॅली काढण्यात आली. एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदि घोषणा देत बंदचे आवाहन करीत रॅली तहसील कार्यालयावर पोहोचली. तेथे मार्गदर्शनपर भाषणे झाल्यानंतर १० लहान बालिकेंच्या हस्ते तहसीलदार संतोष कणसे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ठाणेदार बळीराम गीते व त्यांच्या सहकारी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

मलकापूर येथील महामार्गावर रास्तारोको
मलकापूर – जय भवानी जय शिवाजी… एक मराठा लाख मराठा… आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे… अस्स कस्स देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही… अशा गगनभेदी घोषणा देत शेकडो सकल मराठा समाज बांधवांनी दसरखेड येथे राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या दिला. ५ आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणाविरुध्द मुंडन करीत शासनाचा जाहीर धिक्कार केला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मुख्य मागणीसह समाज हिताच्या इतर मागाण्यांकरिता सकल मराठा समाज बांधवांनी शांततेच्या मार्गात मूक स्वरूपात राज्यभर मोर्चे काढले. या मराठा क्रांती मोर्चाला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला. लाखोंच्या संख्येने मराठा समाज रस्त्यावर उतरला दरम्यान कुठलीही घोषणाबाजी करण्यात आली नाही. अथवा इतर कुठल्याही समाजाला वेठीस धरण्याचा प्रकार घडला नाही. अतिशय संविधानिक व न्यायमार्गाने निघालेल्या या मोर्चाची दखल शासनाने घेतली नाही. मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा होऊनही त्यातून काही मार्ग निघाला नाही. परिणामत: संपूर्ण महाराष्ट्राभर जनआंदोलनाच्या स्वरूपात समाज बांधव रस्त्यावर उतरला आहे. या आंदोलनात अनेक समाज बांधवांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानांसमोर ठिय्या आंदोलन सुद्धा करण्यात आली असे असतानाही शासन मात्र समाजाप्रति उदासिन असल्याने सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदचे पडसाद राष्ट्रीय महामार्गावर दसरखेड येथेही ऊमटले. एमआयडीसी, हाँटेल, शाळा, विद्यालय, किराणा दुकान आदींसह नँशनल हायवे सुध्दा कडकडीत बंद करण्यात आला. यामध्ये नजीकच्या गावातील शेतमजूर सुध्दा सहभागी झाले असुन या बंद दरम्यान कुठलेही सामाजिक, शासकीय वा खासगी मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची काळजी समाज बांधवांकडून घेतल्या जात आहे.

किनगावराजा, राहेरी येथेही उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला
राहेरी बु. – येथे स्थानिक ग्रामस्थांसह दुसरबीड, धानोरा, निमखेड, वर्दडी, जांभोरा, सोनोशी, चांगेफळ आदि परिसरातील गावातील मराठा बांधव एकत्र आले. सकाळपासून नागपूर ते मुंबई महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘आरक्षण मिळालेच पाहीजे’ घोषणा देत होते. या आदोलनात जवळपास ५०० कार्यकर्ते उपस्थित होते. रास्ता रोको दरम्यान भजने, गौळणी व भारुड आदि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा रास्ता रोको करत असताना कोणीही दुखावणार याची दक्षता घेण्यात आली होती. या वेळेस सर्व समाज बांधवाना रोडवरच चहा नाष्ठा दिवसभरासाठी व्यवस्था केली होती व पोलिसाकडून चोक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

याप्रसंगी मलकापूर पांग्रा येथेही मराठा बांधवांनी एकत्र येत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले. दर गुरुवारी येथे भरणारा आठवडी बाजार बंद ठेवण्यात आला होता. तसेच गावातील सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. साखरखेर्डा येथे सकाळी बसस्थानक परिसरातील मार्गावर आडव्या गाड्या उभ्या करीत आंदोलकांनी रास्ता रोको केला. याच दरम्यान घोषणाबाजी करीत गावातून फेरी मारुन बंदचे आवाहन केले. ठाणेदार सचिन शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक ठाणेदार दीपक राणे, पोहेकॉ. अय्युबखाँ पठाण, गुप्त वार्ता विभागाचे गणेश डोईफोडे, पोहेकॉ, गीते, अरविंद चव्हाण, पोकॉ. समाधान पवार, पोकॉ. राजेश मापारी सह संपूर्ण पोलिस यंत्रणाने चोख बंदोबस्त ठेवला असून अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिस्थिती वर लक्ष ठेऊन आहेत.

जिल्ह्यात एसटी महामंडळाचे नुकसान ४५ लाख
मराठा आरक्षणाबाबत संपूर्ण महाराष्ट्र बंदच्या हाकेमुळे संपूर्ण महाराष्ट्र बंद असल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचे आज सुमारे ४५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यामध्ये संपूर्ण जिल्हाभर ४५० गाड्या बंद होत्या. यामध्ये संपूर्ण जिल्हाभरात २६००० कर्मचारी काम करत असून आज सर्व कर्मचारी आपआपल्या डेपोमध्ये हजर राहून त्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. यामध्ये बुलढाणा डेपोचे साडेसात ते आठ लाख तर चिखली डेपो जे ७ लाख रुपये, खामगाव डेपोचे सहा लाख रुपये, मलकापूर डेपोचे पावणेसहा लाख रुपये, शेगाव डेपोचे सव्वा सात लाख रुपये, जळगाव जामोद डेपोचे पाच लाख रुपये, मेहकर डेपोचे ७ लाख रुपये असे एकूण अंदाजे ४५ लाख रुपयांचे नुकसान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांचे झाले असून ही सर्व माहिती विभागीय कार्यालयातील अधिकारी कच्छवे यांनी दिली आहे.

(वृत्त संकलक : राजेश देशमाने, नितेश तांबोळे, राजेश खांडेभराड, डॉ. अनिल मापारी, उमेश हिरुळकर, गजानन गाडेकर)

आपली प्रतिक्रिया द्या