जुलै आणि ऑगस्टमध्ये आलेल्या पुराचे पाणी दहा ते बारा दिवस साचून राहिल्याने जिह्यातील शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तब्बल 20 ते 25 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली होते, याचा सर्वाधिक फटका ऊसशेतीला बसला आहे. आगामी गळीत हंगामात किमान 10 लाख टन उसाचे उत्पादन घटणार आहे. याची शिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांतील साखर कारखान्यांना अधिक झळ बसणार असल्याचे चित्र आहे. गतवर्षी दुष्काळ आणि यंदा अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले असून, ऊस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
सांगली जिह्यात जुलै अखेरला जोरदार पाऊस कोसळला. धरणे मोकळी होती, तोपर्यंत पुराची दाहकता दिसत नव्हती. पण, कोयना आणि चांदोली धरणांतून विसर्ग सुरू झाल्याने पुराचे पाणी सैरभैर झाले. नदी, ओढय़ाकाठची हजारो हेक्टर पिके बघता बघता पाण्यात गेली. गेले दहा ते बारा दिवस ऊस, भात, सोयाबीन ही पिके पाण्याखाली आहेत. त्यांचे नुकसान होणार आहे. मागील 2019 आणि 2021च्या महापुरात जिह्यातील 40 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले होते. त्यावेळी पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्या तुलनेत यंदा क्षेत्र कमी असले तरी पाणी एकसारखे शिवारात राहिल्याने नुकसान अधिक होण्याचा धोका आहे.
सन 2019 आणि 2021 नंतर या वर्षीच्या पुराने मोठय़ा प्रमाणात वित्तहानी झाली. कृष्णा आणि वारणा नदीकाठांवरील गावांमध्ये झालेल्या नुकसानीचे प्रशासनाकडून पंचनामे सुरू आहेत. या पावसामुळे सोयाबीन, भाजीपाला, भुईमूग, ऊस, भात आणि हळद आणि पपई पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर आणि अतिवृष्टीमुळे मिरज, वाळवा, शिराळा आणि पलूस तालुक्यातील अंदाजे 116 गावांतील 25 हजार शेतकऱयांचे 8556 हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या चार तालुक्यांतील 20 हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे.
सांगली जिह्यात 60 हजार हेक्टरपैकी उसाचे किमान 30 हजार हेक्टर क्षेत्र पाण्याखाली राहिल्याने किमान 10 लाख टन उसाच्या उत्पादनावर परिणाम होणार, हे निश्चित झाले आहे. पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर ओसरल्यानंतरच सुरू झाले आहेत. शासनाच्या निकषानुसार 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या पिकांनाच भरपाई मिळते. ऊस पाण्यातून बाहेर आल्यानंतर लगेचच नुकसानीला सुरुवात होत नाही. पंधरा दिवसांनंतर त्याला फुटवे फुटतात, त्यामुळे पाण्याखाली गेलेल्या सर्वच उसाला शंभर टक्के भरपाई मिळणे गरजेचे आहे.
सोयाबीन थेट कुजायलाच सुरुवात
z सोयाबीन पाण्याखाली गेले की ते लगेचच कुजण्यास सुरुवात करते. पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. त्या तुलनेत भात आठ दिवस पाण्याखाली राहिला आणि त्यानंतर खताचा डोस दिला तर त्याचे किमान 50 टक्के नुकसान टाळता येऊ शकते. परंतु पाणी लवकर कमी न झाल्याने भाताला फटका बसला आहे.
पंचनामे होताच तत्काळ मदत द्या – संजय कोले
z जुलै-ऑगस्टमध्ये आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठावरील हातातोंडाला आलेली पिके वाया गेली आहेत. त्यामुळे शेतकऱयांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याचा सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला. याशिवाय उसाचेही नुकसान मोठय़ा प्रमाणात झाले आहे. सरकारने पंचनामे होताच तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शरद जोशी शेतकरी संघटनेचे सहकार राज्य आघाडीप्रमुख संजय कोले यांनी केली.