पोलीस कोठडीतील चोरट्याने केला आत्महत्येचा प्रयत्न

251

नांदेड जिल्ह्यातून २६ दुचाकी चोरी करुन हिंगोली जिल्ह्यात विक्री करणारा सराईत चोरटा हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन दिवसापूर्वी जेरबंद केला होता. या चोरट्याने पोलीस कोठडीत असतांना मंगळवारी फरशीच्या तुकड्याने स्वत:चा गळा चिरुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असून पोलिसांनी जखमी चोरट्यास उपचारासाठी नांदेड येथे दाखल केले आहे.

नांदेड जिल्ह्यातून २६ दुचाकीची आरोपी देवीदास बाबुराव कांबळे याने चोरी करुन हिंगोली जिल्ह्यात विक्री केली होती. या चोरट्यास कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापुर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  १७ ऑगस्ट रोजी जेरबंद करुन त्याला सेनगाव येथील न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी न्यायालयाने आरोपीला २० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, न्यायालयातून पोलीस कोठडीत घेऊन जात असतांना सराईत चोरटा  देवीदास कांबळे याने पोलिसांना मोरवाडी शिवारात गुंगारा देऊन तो पसार झाला होता. त्यानंतर आखाडा बाळापुर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोंबींग ऑपरेशन राबवून अवघ्या आठ तासात या चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.

दरम्यान, आज २० ऑगस्ट रोजी पोलीस कोठडीत असतांना देवीदास कांबळे या चोरट्याने फरशीच्या तुकड्याने स्वत:चा गळा चिरुन घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने तो गंभीररित्या जखमी झाला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी धाव घेत देवीदास कांबळे  यास ताब्यात घेतले. त्यानंतर गंभीररित्या जखमी असलेल्या या चोरट्यास पोलिसांनी उपचारासाठी आखाडा बाळापुर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्त्रावर होत असल्याने तीन टाके देत प्रथमोपचार करुन त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले आहे. या दुचाकी चोरट्याने आखाडा बाळापुर पोलिसांच्या नाकीनऊ आणले असून हा सराईत दुचाकी चोरटा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला असल्याचे दिसून येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या