
>> वैश्विक, [email protected]
परग्रह म्हटलं की, आपली पृथ्वी वगळता आपल्याच सूर्यमालेतील इतर ग्रहांची नावं नजरेसमोर येतात. एकेकाळी म्हणजे जेव्हा पृथ्वीचंच स्वरूप आपल्याला पुरेसं ठाऊक नव्हतं तेव्हा (आणि सध्यातरी पृथ्वी पूर्णाशाने समजलीय असं कुठे म्हणता येतंय?) बुध, शुक्र, मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून वगैरे मंडळी ‘परग्रह’ ठरली आणि आजही तशीच आहेत.
जसजसा आपल्या वैज्ञानिकांचा विश्वविषयक आवाका वाढू लागला, तसतशी विश्वनिर्मितीच्या क्षेत्रातील समीकरणं अधिक अद्ययावत होऊ लागली. एडवीन हबल यांच्या ‘रेडशिफ्ट’ (ताम्रसृती) सिद्धांताचा पडताळा येऊ लागल्यावर विश्वाची प्रसरणशीलता जाणवू लागली आणि आपल्या शक्तिशाली दुर्बिणी थेट अंतराळात पोहोचून निरीक्षण करू लागल्या. तेव्हा एकोणीसाव्या शतकापर्यंतच्या विश्वसंकल्पना बदलू लागल्या. विसाव्या शतकाने अवकाश संशोधनाला सर्वार्थाने गती दिली. मग ती सैद्धांतिक नवसमीकरणांची असो अथवा प्रत्यक्ष यानांद्वारे केलेल्या निरीक्षणाची असो, विश्व म्हणजे नेमपं काय याचा बऱयापैकी अंदाज आला.
अर्थात यातून ‘सारेचि विश्व आकळले’ असं घडलं नाही, परंतु काय माहीत नाही याची तरी माहिती झाली. आपण ज्याला विश्व म्हणतो, त्या विश्वाची व्याप्ती दृश्य स्वरूपात केवळ चार ते पाच टक्केच आहे आणि त्यातच विश्वनिर्मितीपासूनच अनेक ट्रिलियन दीर्घिकांचा (एक ट्रिलियन म्हणजे एकावर बारा शून्य अशा ट्रिलियन दीर्घिका!) मागोवा घेण्याची आस निर्माण झाली. हबल, चंद्रा, जेम्स वेब अशा अवकाश दुर्बिणी सध्या आपल्याला ‘घरबसल्या’ विश्वरूप दर्शन घडवतायत याची जाणीव आपल्या रोजच्या जीवनाच्या छोटय़ाशा वर्तुळाला ‘विराट’ समजणाऱया मनांना किती असते ठाऊक नाही, पण वैज्ञानिक जग वेगाने पुढे चाललंय.
त्यामुळे जुन्या पारंपरिक संकल्पना बदलतायत. केवळ आपल्या सौरसंकुलातले ‘पर’ग्रह नव्हेत, तर आपल्या आकाशगंगेतील सुमारे 100 अब्ज ताऱयांपैकी काही ताऱयांभोवतीचे परतारा ग्रहसुद्धा शोधण्यात आणि त्यांची पृथ्वीशी तुलना करण्यात संशोधकांना रस वाटतो. आपण पृथ्वीवर राहत असल्याने अशीच एखादी पृथ्वी ‘कुठेतरी’ असेल का याचा शोध अनिवार ओढीने चालला आहे. अनेकदा तशा शक्यता समोर येतात. मात्र इतक्या दूरस्थ सजीवांना (ते प्रगत असेलच तर) कसा संपर्क करावा याचीही ‘विवंचना’ आहेच. मात्र ही काळजी सुखद असून असं जर कोणी सापडलं तर त्यांच्याशी संपर्क करून विश्वासंबंधी काही वेगळीच जी आपल्याला ठाऊक नाही अशी माहिती मिळू शकते.
यातूनच ‘सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्टेरियल इन्टेलिजन्स’ पिंवा ‘सेटी’ या प्रकल्पाची विसाव्या शतकाच्या सुरुवातीला कार्यप्रणाली ठरली. ‘आऊटर स्पेस’ पिंवा दूर अंतराळातून येणारे अनियमित पिंवा वेगळ्याच ‘रचनेचे’ पिंवा प्रकारचे रेडिओ सिग्नल्स येत असतील तर ते ‘पकडून’ त्याचं पृथक्करण करून ‘परताऱयां’भोवतीच्या ग्रहांचा काही सुगावा लागतो का ते पाहणं विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वेगाने सुरू झालं. 1896 मध्येच निकोल टेस्ला यांनी मंगळावरही बिनतारी (वायरलेस) संदेशाद्वारा संपर्क साधता येईल असं म्हटलं. तो काळ ‘मंगळावर बुटके जीव राहतात’ अशा समजुतीचा होता.
मात्र सौरमालिकेपल्याडच्या ताऱयांची नि ग्रहांची जाणीव वाढीला लागल्यावर ‘दूरस्थ’ ग्रहांची संकल्पना आपल्या सौरमंडलापुरती मर्यादित न राहता ती सतत विस्तारत गेली. विराट विश्वातील मल्टी-ट्रिलियन दीर्घिकांमध्ये आपली आकाशगंगा ही एक छोटासा भाग व्यापणारी (1लाख प्रकाशवर्षे!) दीर्घिका आहे हे लक्षात आल्यावर त्यातील सूर्यमाला तर ‘नगण्य’ म्हणावी इतकी लहान असल्याचा ‘साक्षात्कार’ झाला.
आपल्या सौरमालेतील ग्रहांच्या यान भेटीनंतर तर इथे कुठे जवळपास ‘लिटिल मेन’ वगैरेसारखं कोणी नाही आणि एच. जी. वेल्सच्या कल्पनेतलं मंगळावरही कोणी राहत नाही. या सर्व गोष्टी स्पष्ट झाल्या आणि त्यातूनच 13.7 अब्ज प्रकाशवर्षे विस्तारलेल्या 5 टक्के का होईना, पण विराटच विश्वात आणखी कोणी बुद्धिमान सजीव असतील का यावर चर्चा होऊ लागली.
या संस्थेचे पॉल शुल्झ एका मुंबईत भेटले होते. सेटी प्रकल्पाविषयी भरभरून सांगत होते, परंतु या साऱयाला लागणारा अमाप पैसा आणि संशोधनासाठी महत्त्वपूर्ण असलेली पर्टो रिको येथील ऑरिसिबो रेडिओ दुर्बिणीचं नुकसान यातून सेटीला थोडा सेटबॅक मिळाला. परंतु आता असे परताराग्रह शक्तिशाली अवकाश दुर्बिणीच रोज समोर आणतायत. त्यातल्या किती ग्रहांवर वसाहत योग्य वातावरण आहे? ती ‘वस्ती’ आपल्यासारखीच प्रगत असेल का? असे अनेक प्रश्न आहेतच. प्रश्न पडले तरच उत्तरे शोधावीशी वाटतात. रचनात्मक चिकित्सा हा तर विज्ञानाचा पाया आहे. मग आतापर्यंत असे किती परतारा ग्रह सापडलेत? पुढच्या लेखात पाहू.