Sunetra Pawar – सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड; खासदारकीचा राजीनामा, लोकभवनात घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अजित पवार गटाच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची  निवड करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी विधान भवनात झालेल्या विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीमध्ये एकमताने हा ठराव मान्य करण्यात आला.

बैठकीत ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांनी प्रस्ताव मांडला, तर छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. यानंतर सर्व आमदारांनी एकमताने सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड केली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचे अध्यक्ष सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा सोपवला.

अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले. शुक्रवारी रात्री सुनेत्रा पवार आणि जय पवार मुंबईत दाखल झाले. ‘देवगिरी’ निवासस्थानी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यानंतर सर्व विधान भवनात पोहोचले. विधान भवनात अजित पवार गटाच्या कार्यालयात अजित पवारांच्या प्रतिनिमेला श्रद्धांजली वाहून विधिमंडळ सदस्यांची बैठक सुरू झाली. या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ गटनेतेपदी आणि विधिमंडळ नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. विधिमंडळातील सर्वाधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आले.

पहिला महिला उपमुख्यमंत्री

अजित पवार गटाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार लोकभवन दरबारात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आणि सुनेत्रा पवारांच्या गटनेतेपदाचे पत्र त्यांच्याकडे सोपवले. आता मुख्यमंत्री हे पत्र राज्यपालांना पाठवतील आणि सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्रीपदासाठी शिफारस करतील.

पालकमंत्री, अर्थमंत्रीपदाचं काय?

अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह राज्याचे अर्थमंत्रीपद होते. तसेच पुणे आणि बीडचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे होते. आता त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद सोपवले जाणार आहेत. मात्र अर्थमंत्रीपद, तसेच पुणे-बीडचे पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.