लवकर या… लवकर जा, महिला शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार सूट; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मोठी घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय सेवेतील महिला कर्मचाऱयांना आता ‘कम अर्ली… गो अर्ली’ उपक्रमात कार्यालयात सकाळी अर्धा तास लवकर येऊन सायंकाळी अर्धा तास लवकर जाता येणार आहे. शिवाय महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजादेखील मिळणार असून एक वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेता येणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत आज ही मोठी घोषणा केली.

जागतिक महिला दिनानिमित्त्त विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज उत्तर देताना महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देताना नवीन योजनाही जाहीर केल्या.

राज्यात चौथे महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील महिलांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावे यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत असून बालविवाह रोखणे, अत्याचारमुक्त गाव निर्माण करणे आणि मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.

रेल्वे स्टेशनवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा

  • महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकार ‘लाडकी बहीण’, ‘नमो महिला सक्षमीकरण’, ‘लेक लाडकी’, ‘अन्नपूर्णा’, ‘लखपती दीदी’ यांसारख्या योजना सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
  • बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी उमेद मॉल, उमेद मार्ट आणि महालक्ष्मी सरस यांसारखे उपक्रम राबविण्यात येत असून बचत गटांची उत्पादने ऑनलाइन उपलब्ध केली जात आहेत.
  • महिलांच्या सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात येत असल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट आणि बोरिवली स्थानकांवर सायबर गुन्हे रोखण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आल्याची माहितीही सुनेत्रा पवार यांनी यावेळी दिली.

सुनेत्रा पवार गहिवरल्या

अजितदादांनी महिलांच्या उन्नत्तीसाठी मोठे कार्य केले. या अर्थसंकल्पासाठीही त्यांची जोरदार तयारी सुरू होती, असे सांगत सुनेत्रा पवार यांनी दादांच्या आठवणी सांगितल्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांच्या ओळी त्यांनी ऐकवल्या. ‘अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर… आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर.’ या ओळींत स्त्राrची सहनशीलता, सहनशक्ती, कष्टाची, सृजनशक्तीची ताकद दडलेली आहे. आजची स्त्राr अशाच संकटांना सामोरे जात स्वतःचा, कुटुंबाचा, समाजाचा विकास घडवत आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांना गहिवरून आले.

गर्दीचा त्रास टाळण्यासाठी

लोकलला सकाळी आणि संध्याकाळी प्रचंड गर्दी असते. एकाच वेळी होणाऱया गर्दीचा त्रास टाळण्यासाठी ही योजना असल्याचे यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या. यामध्ये कार्यालयात सकाळी 9.15 ते 9.45 या वेळेत महिला जितकी मिनिटे लवकर येऊन काम करतील तितकी मिनिटे त्यांना सायंकाळी लवकर कार्यालयातून निघता येणार आहे. महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी केले.