
राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शपथ घेतली. लोकभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद रिक्त झालं होतं. यातच आज अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती, यानंतर आता त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते.
यादी शनिवारी दुपारी २ च्या सुमारास अजित पवार गटाची विधिमंडळात बैठक पार पडली. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची अजित पवार गटाच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. यावेळी पक्षाचे विधानसभा आणि विधान परिषदेचे सर्व आमदार उपस्थित होते. विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. यानंतर आता अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पक्षाची धुरा सांभाळी असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.



























































