
काव्या मारन यांच्या नेतृत्वाखालील सन टीव्ही नेटवर्कच्या मालकीच्या ‘सनरायझर्स लीड्स’ या संघाने पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला आपल्या संघात स्थान दिल्यामुळे हिंदुस्थानात मोठा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयावर हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी कडक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हिंदुस्थानच्या मालकीच्या फ्रँचायझींनी पाकिस्तानी खेळाडूंना करारबद्ध करणे टाळले पाहिजे, कारण अशा खेळाडूंना मिळणारा पैसा अप्रत्यक्षपणे हिंदुस्थानच्या विरोधात वापरला जाऊ शकतो, असा युक्तिवाद माजी कर्णधाराने केला आहे.
लंडनमध्ये पार पडलेल्या ‘द हंड्रेड’ (The Hundred) स्पर्धेच्या पहिल्या पुरुष लिलावात अबरारला १,९०,००० पाउंडला खरेदी करण्यात आले. या स्पर्धेत हिंदुस्थानी मालकीच्या संघाने निवडलेला तो पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू ठरला आहे. या निर्णयामुळे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले असून, संबंधित फ्रँचायझीच्या सोशल मीडिया खात्यांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली आणि ती काही काळासाठी स्थगित (Suspend) देखील करण्यात आली होती.
‘मिड-डे’ मधील आपल्या स्तंभात गावसकर यांनी लिहिले की, २००८ च्या मुंबई हल्ल्यानंतर हिंदु्स्थानच्या क्रिकेटने घेतलेली भूमिका पाहता हा संताप समजण्यासारखा आहे. ‘द हंड्रेडमधील एका फ्रँचायझीच्या हिंदुस्थानच्या मालकाने पाकिस्तानी खेळाडूला खरेदी केल्यामुळे निर्माण झालेला गदारोळ मुळीच आश्चर्यकारक नाही’, असे गावसकर यांनी नमूद केले.
त्यांनी असे म्हटले की, पाकिस्तानी खेळाडूंना दिले जाणारे मानधन शेवटी कराच्या रूपात त्यांच्या सरकारकडे जाते. ‘पाकिस्तानी खेळाडूला दिले जाणारे शुल्क, जो नंतर आपल्या सरकारला प्राप्तिकर देतो आणि ते सरकार त्या पैशातून शस्त्रे खरेदी करते, हे अप्रत्यक्षपणे हिंदुस्थानी सैनिकांच्या आणि नागरिकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरते. ही जाणीव झाल्यामुळेच हिंदुस्थानी संस्था पाकिस्तानी कलाकार आणि खेळाडूंना घेण्याचे टाळत आहेत’, असे गावसकर म्हणाले.
गावसकर पुढे म्हणाले की, पेमेंट हिंदुस्थानी कंपनीकडून असो किंवा परदेशातील उपकंपनीकडून, त्याची जबाबदारी मालकाचीच असते. ‘जर मालक हिंदुस्थानी असेल तर तो किंवा ती हिंदुस्थानच्या जीवितहानीला कारणीभूत ठरत आहे, हे इतके साधे गणित आहे,’ असे लिहित त्यांनी ‘एखाद्या स्पर्धेतील यश हे राष्ट्रीय भावनेपेक्षा मोठे आहे का?’, असा सवाल उपस्थित केला.
हिंदुस्थानी चाहते या निर्णयाचा जाहीर निषेध करू शकतात, असा इशाराही त्यांनी दिला. ‘या संघाच्या प्रत्येक सामन्यात हिंदुस्थानी चाहत्यांकडून मोठी निदर्शने झाल्यास आश्चर्य वाटणार नाही. स्टार खेळाडू असूनही प्रेक्षक या सामन्यांवर बहिष्कार टाकू शकतात,’ असेही गावसकर यांनी म्हटले आहे.
दुसरीकडे, हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले की, हा विषय परदेशी लीगशी संबंधित असल्याने बीसीसीआय यात हस्तक्षेप करू शकत नाही आणि अंतिम निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित फ्रँचायझीला आहे.
























































