सवा कोटीच्या मुंबईत 108 नंबरच्या 97 अ‍ॅम्ब्युलन्स, अ‍ॅम्ब्युलन्सची संख्या वाढवा, सुनील शिंदे यांची मागणी

आपात्कालीन स्थितीत तातडीची वैद्यकीय मदत मिळावी म्हणून 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या. मुंबईत अशा फक्त 97 रुग्णवाहिका आहेत. सवा कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या मुंबईसाठी त्या अपुऱया पडत असून त्यांची संख्या तातडीने वाढवण्यात यावी अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत केली.

सुनील शिंदे यांनी यासंदर्भात विशेष उल्लेख सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. मुंबईसाठी देण्यात आलेल्या 108 क्रमांकाच्या 97 रुग्णवाहिकांपैकी 45 रुग्णवाहिका रेल्वेमार्गांसाठी दिलेल्या आहेत. मुंबईत आधीच रुग्णवाहिकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे आपत्कालीन स्थितीत मुंबईतील रुग्णांना वेळेवर मदत मिळत नाही. रुग्णवाहिका जागेवर नसणे, गरजेच्या ठिकाणी वेळेवर न पोहोचणे यामुळे अपघातग्रस्त, प्रसूतीसाठी अडलेल्या महिलांना रुग्णवाहिका ‘गोल्डन अवर’मध्ये उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी सातत्याने येत आहेत. खासगी रुग्णवाहिका परवडणाऱया नसतात. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक सुविधेवर अवलंबून राहावे लागते, अशी वस्तुस्थिती सुनील शिंदे यांनी मांडली.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ही सुविधा अधिक सक्षम करण्याची गरज आहे. या रुग्णवाहिकांची कालमर्यादा आणि वापर क्षमता संपुष्टात आली असल्याने शासनाने मुंबईत तातडीने नव्या रुग्णवाहिका उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी सुनील शिंदे यांनी केली.

बेस्टमधील एससी-एसटी व अन्य कर्मचाऱ्यांना तातडीने पदोन्नती द्या

बेस्ट उपक्रमाच्या अभियांत्रिकी विभागातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती व इतर संवर्गातील कर्मचाऱयांना 2017 पासून आजतागायत कोणत्याही प्रकारची पदोन्नती देण्यात आलेली नाही. ती तातडीने देण्यात यावी, अशी मागणीही सुनील शिंदे यांनी विधान परिषदेत विशेष उल्लेख सूचनेद्वारे केली. 3 नोव्हेंबर 2025 रोजी अनुसूचित जाती आयोगाने बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक व वरिष्ठ अधिकाऱयांबरोबर झालेल्या बैठकीत हा गंभीर अन्याय स्पष्टपणे निदर्शनास आणूनही बेस्ट प्रशासनाकडून कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे योग्य पावले उचलण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

निवासी डॉक्टरांना सेवासुविधा पुरवा

राज्यातील 18 वैद्यकीय महाविद्यालयात महाराष्ट्र निवासी डॉक्टर संघटनेने केलेल्या सर्वेक्षणानुसार 5800 पेक्षा जास्त निवासी डॉक्टर्स आहेत. त्यांना पुरेशी सुरक्षा आणि सेवासुविधा पुरवा अशी मागणी सुनील शिंदे यांनी औचित्याच्या मुद्दय़ाद्वारे केली. डॉक्टरांवरील हल्ले आणि धमक्यांचे प्रमाण वाढले आहे. हॉस्टेल परिसरात अज्ञातांना थेट प्रवेश दिला जात असल्याने महिला निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांत 10 तारखेपर्यंत डॉक्टरांना मानधन मिळत नाही. त्याचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावर, निर्णय क्षमतेवर होत आहे, अशी माहिती सुनील शिंदे यांनी सभागृहाला दिली.