
रायगडच्या पालकमंत्री पदावरून पडद्यामागून ‘सोंगट्या’ टाकणाऱ्या मिंध्यांच्या आमदारांना चेपण्यासाठी खासदार सुनील तटकरे यांनी ‘घारे अस्त्र’ बाहेर काढले आहे. राज्यात भाजप मिंधे-अजित पवार गटाची महायुती असताना तटकरे यांनी कर्जतमध्ये अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना रसद पुरवून मिंध्यांच्या महेंद्र थोरवे यांना विधानसभा निवडणुकीत तोंडाला फेस आणल्याची चर्चा होती. आता तटकरे यांनी घारे यांना पक्षात घेऊन त्यांच्या गळ्यात अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाची माळ घातली आहे. त्यामुळे सुनील तटकरे व मंत्री अदिती तटकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करणाऱ्या थोरवे यांना घेरण्यासाठीच ही खेळी केली असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात सत्तास्थापनेनंतर राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे यांच्या गळ्यात रायगडच्या पालकमंत्री पदाची माळ पडली. मात्र या निर्णयाला शिंदे गटाकडून जोरदार विरोध करण्यात आला. यांनतर अदिती तटकरे यांच्या पालकमंत्री पदाला स्थगिती देण्यात आली. तेव्हापासून शिंदे गट व तटकरे यांच्यातील वाद सुरू असून दोन्ही बाजूकडून वारंवार एकमेकांची उणीधुणी काढण्यात येत आहेत. त्यातच आता सुनील तटकरे यांनी शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. घारे यांची नुकतीच राष्ट्रवादीच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. घारे हे महेंद्र थोरवे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. घारे यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी व शिंदे गटात कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याची चर्चा सुरू आहे.
हकालपट्टी केवळ नावाला
विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपात कर्जत विधानसभेची जागा शिंदे गटाकडे गेल्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष असणाऱ्या सुधाकर घारे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. घारे यांनी अर्ज मागे न घेतल्याने राष्ट्रवादीतून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र ही हकालपट्टी केवळ दाखवण्यासाठी असल्याची टीका मिंध्यांकडून केली होती.
करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी ताकद
तटकरे यांच्या आशीर्वादामुळे घारे यांनी थोरवे यांना निवडणुकीत तोंडाला फेस आणला. त्यामुळे थोरवे केवळ ५ हजार ६९४ मतांनी विजय झाले होते. यानंतर अदिती तटकरे यांना पालकमंत्री पद मिळू नये याकरिता आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी यांच्या आधी थोरवे यांनी पुढाकार घेतला होता. ही सल तटकरे यांच्या मनात आहे. त्यामुळेच थोरवे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी घारे यांना ताकद दिली जात असल्याची चर्चा आहे.