सुपर सुखोई बनणार घातक फायटर जेट; 400 किलोमीटर रेंज, एआय तंत्रज्ञान… शत्रूंची झोप उडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानच्या वायूदलाचे सर्वात शक्तिशाली लढाऊ विमान Su-30MKI बाबत लवकरच एक मोठा निर्णय होणार आहे. एकीकडे सुपर सुखोईच्या अपग्रेड कार्यक्रमाला येत्या एक- दोन महिन्यांत कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे, तर दुसरीकडे त्याला इस्रायलच्या घातक रॅम्पेज मिसाईलची जोड मिळून त्याची स्ट्राईक क्षमता कित्येक पटीने वाढली आहे. 400 किलोमीटर रेंज, एआय तंत्रज्ञान या अपग्रेडनंतर Su-30MKI जगातील सर्वात घातक फायटर जेट बनेल.

हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डी. के . सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार Su-30MKI च्या अपग्रेडेशनची तयारी पूर्ण झाली आहे. एचएएल, वायूदल आणि डीआरडीओ यांच्यामध्ये महत्त्वाच्या मुद्दय़ांवर सहमती झालेली आहे. आता केवळ औपचारिक मंजुरीची प्रतीक्षा आहे. या योजनेत तब्बल 84  Su-30MKI लढाऊ विमाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज केली जातील. Su-30MKI हे वायुदलाचे सर्वाधिक संख्येने आणि शक्तिशाली असे फायटर जेट आहे. हवाई संरक्षण, डीप स्ट्राईक, आणि सागरी अभियानांमध्ये त्याची निर्णायक भूमिका असते.

Su-30MKI  ची मारक क्षमता वाढवण्यासाठी त्यात इस्रायलचे सुपरसॉनिक रॅमपेज एयर टू सर्फेस मिसाईल जोडले जाणार आहे. हे तेच मिसाईल आहे जे ऑपरेशन सिंदूरदरम्यान वापरण्यात आले होते आणि त्यामुळे शत्रूचे मोठे नुकसान झाले होते

अत्याधुनिक टेक्नॉलॉजी

सुपर सुखोई अपग्रेड अंतर्गत Su-30MKI ला नव्या स्तरावर नेले जाईल. त्यामध्ये लांब पल्ल्याचे लक्ष्य भेदणारे रडार, अत्याधुनिक डिजिटल कॉकपिट, एआय आधारित मल्टी फंक्शन डिस्प्ले, वॉईस कमांड सिस्टीमचा समावेश असेल. यासोबतच नवीन आयआरएसटी सिस्टीम, उन्नत सेल्फ प्रोटेक्शन जॅमर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि प्रगत डेटा ंिलक क्षमतादेखील जोडली जाईल.