
वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तत्त्वज्ञानाच्या गप्पा झोडून भाजप आमदार सुरेश धस यांचा लाडका खोक्याभाऊ ऊर्फ सतीश भोसले हा थेट प्रयागराजला पोहोचला! मोबाईल लोकेशनवरून त्याचा ठावठिकाणा लागताच पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याच्या तिथेच मुसक्या आवळल्या. प्रयागराज विमानतळावरून हे खोक्याभाऊ पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्यांना बेडय़ा ठोकल्या.
शिरूर येथे एका जणास बेदम मारहाण करण्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वतःच खोक्याभाऊच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल होताच खोक्याभाऊ गायब झाले, ते एका वाहिनीवर मुलाखत देण्यासाठी उगवले. या मुलाखतीत त्यांनी आपण कसे निर्दोष आहोत हे सांगितले. माध्यमांना खोक्याभाऊचा पत्ता सापडला, पण पोलिसांना तो सापडत नसल्याने चर्चा सुरू झाली.
खोक्याभाऊ तडीपार
भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले याच्या तडीपारीचा प्रस्ताव बीड पोलिसांनी महसूल विभागाला दिला होता. या प्रस्तावाला आज उपविभागीय दंडाधिकाऱ्यांनी मान्यता दिली.
पोलीस अधीक्षकांच्या जाळय़ात अडकला
सतीश भोसले बीडमधून गायब झाला, तो थेट प्रयागराजला पोहोचला. मोबाईल लोकेशनवरून त्याचा प्रयागराजमधील ठावठिकाणा लागताच पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी उत्तर प्रदेश पोलिसांशी संपर्क साधला. प्रकरणाचे गांभीर्य समजून घेत तातडीने कारवाई करण्याची विनंती केली. उत्तर प्रदेश पोलिसांनी खोक्याभाऊचा ठावठिकाणा शोधून त्याला ताब्यात घेतले. खोक्याभाऊ प्रयागराज विमानतळावरून पसार होण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली.